डोंबिवली : डोंबिवलीकर बाळ गोपाळांची अंगभूत कला वृद्धिंगत होण्यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण संपादीत डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार मासिकाच्या माध्यमांतून ‘डोंबिवलीकर किलबिल फेस्टिवल 2018’ आयोजित केला करण्यात आला आहे. किलबिल महोत्सवात सुमारे सात हजार बाल-गोपाळ ‘संडे फूल टू फन डे’ चा आनंद लुटणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली. पूर्वेकडील हॉटेल लिजेंड मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते.
रविवार, दि. 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 ते 10 या कालावधीत पश्चिमकडील भागशाळा मैदान येथे किलबिल फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीच्या सुट्टीत बाळ-गोपाळांनी धम्माल मस्ती आणि मौज करण्यासाठी फ्री एन्ट्री सह मोफत सर्व खेळांची रचना केली आहे. किलबिल महोत्सवात चित्रकला विषयात पॉटरी आर्ट, टॅटू मेंदी, कार्टून… साहसी खेळात बर्मा ब्रिज, रिव्हर क्रॉसिंग, वॉल क्लायमिंग… जादूच्या प्रयोगात पपेट शो, कठपुतळी, वायरची खेळणी, बालनाट्य तर छोटा भीम, चार्ली चाप्लीन, स्पायडर मॅन, मिकी माऊस अशा विविध गमंती-जमती बाळ-गोपाळांना करता येणार आहेत. याशिवाय नृत्य आणि अभिनयाचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे. या व्यतिरिक्त लाखेच्या बांगड्या आणि बरंच काही वेगळेपण या किलबिल महोत्सवात असून स्थानिक संस्थेच्या माध्यमांतून मुलांना सादरीकरणाची संधी मिळणार आहे. यावेळी डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार या दिवाळी अंकाचे प्रकाशन होणार असून यामधील अंधत्वावर मात करून आम्हीही मागे नाही हे सांगणारे लेखन डोळस डोंबिवलीकरांना प्रेरणादायी ठरणार आहे. त्याचप्रमाणे नव्या तंत्राद्यानावर आधारित ऑडीओ दिवाळी अंकाच्या सीडीचे प्रकाशनही होणार आहे.