डोंबिवली : उच्च रक्तदाब, मधुमेह आणि सध्याची जीवनपद्धती आदी कारणांमुळे किडनी रुग्णांचे प्रमाण वाढत असून या भारतातही मोठ्या प्रमाणात किडनी रुग्णांची वाढ होत आहे. विशेष म्हणजे 30 ते 35 वयोगटातील तरुण पिढीला या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आरोग्याबाबतच्या तपासण्या व औषधांकडे दुर्लक्ष न करता आहार, विहार, व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जीवनशैली आत्मसात करावी असे मत मूत्रपिंड विकार तज्ञ डॉ. दिनेश महाजन यांनी व्यक्त केले.
14 मार्च वर्ल्ड किडनी डे (जागतिक मूत्रपिंड दिन) निमित्त डोंबिवली पत्रकार संघातर्फे मूत्रपिंड विकार तज्ञ डॉ. दिनेश महाजन यांचा ‘डायबेटीस व किडनी केअर’ या विषयावर वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यावेळी डॉ. महाजन यांनी याबाबतची महत्वपूर्ण माहिती दिली.
यावेळी डॉ. महाजन म्हणाले, किडनी रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने सावधान बाळगले पाहिजे. काही अल्प प्रमाणत आनुवंशिक रुग्ण दिसून येत असले तरी भारतात किडनी रुग्णांचे प्रमाण सुमारे 17 टक्के आहे. किडनी रोग हा मोठा खर्चिक असल्याने जागरुकता राखली पाहिजे. याविषयी सरकारी प्रयत्न होत असले तरी ते लोकसंखेच्या प्रमाणात कमी आहेत. आपली जीवनशैली हिमोग्लोबिनची कमतरता, लगविला फेस येणे, जेवण कमी, उलटी आदी प्राथमिकता किडनी रोगात दिसून येते. यासाठी जेवणात तेल, साखर, मिठ यांचे प्रमाण कमी ठेवले पाहिजे. जेवणात हिरव्या पालेभाज्या घ्याव्यात. लठ्ठपणा किडनीचे आजार वाढवतात. किडनी हेल्दी कशी राहील यावर भर दिला पाहिजे.
किडनी रुग्णांसाठी डायलिसिस पद्धत महत्वाची असून समाजामध्ये डायलिसिसबाबत चुकीची माहिती दिली जात आहे आणि त्यासाठी जनजागृतीची गरज आहे. देशात प्रत्येक वर्षी नवीन दोन लाख रुग्णांची भर पडत आहे. लहान मुलांमध्ये किडनी रुग्ण दिसून येत असून त्याचे प्रमाण सूक्ष्म आहे. ज्यावेळी किडनी रक्तशुद्धीचे काम नीट करत नाही त्यावेळी फक्त डायलिसिस हीच उपचार पद्धती हाताळावी लागते. आजकाल किडनी प्रत्यारोपणही होत असून तेही खूप खर्चिक व किडनीदाता यावर अवलंबून आहे. जगात आर्टिफिशल किडनी संशोधन सुरु असल्याने त्याचा फायदा भविष्यात किडनी रुग्णांना होईल. कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीराम कांदू यांनी केली तर आभार प्रदर्शन शंकर जाधव यांनी केले.