मुंबई : सांस्कृतिक, कला, नाटय़, चित्रपट, संगीत, फॅशन, महाराष्ट्रीय तसेच भारतीय लोकनृत्यांचे विविध प्रकार मुंबईकर व मुंबईला भेट देणाऱ्या देशातील पर्यटकांना पाहता यावेत यासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध केले जाणार आहे. १९ नोव्हेंबरपासून हे व्यासपीठ सुरु केले जाणार आहे.
जहांगीर आर्ट गॅलरी समोरील चौकातील खुले व्यासपीठाच्या जागेची गुरुवारी अतिरिक्त आयुक्त ज-हाड यांनी पाहणी केली. यावेळी चौक व आजुबाजूच्या पदपथांची दुरुस्ती, चौकाची रंगरंगोटी व वृक्ष फाद्यांची योग्यरित्या छटाई तसेच हा परिसर आकर्षक दिसेल याबाबत कार्यवाही करण्याचे संबंधितांना आदेश दिले. के. दुभाष मार्गावर ज्या ठिकाणी हे “खुले व्यासपीठ” असेल, त्या रस्त्यावरील वाहनतळ शनिवारी, १८ नोव्हेंबर, २०१७ दुपारनंतर बंद करण्यात येणार असून रविवार, दिनांक १९ नोव्हेंबर सायंकाळपर्यंत सदर वाहनतळ बंद राहील. या ठिकाणी असलेले इतर वाहनतळ नेहमीप्रमाणेच वाहनांच्या पार्किंगसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महापालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे १९ नोव्हेंबर, २०१७ पासून मे, २०१८ अखेरपर्यंत दर रविवारी होणाऱ्या “खुले व्यासपीठ” या संकल्पनेतून मुंबई शहराची ओळख संपूर्ण जगभर पोहचविण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए. एल. जऱ्हाड यांनी सांगितले. तसेच अशा व्यासपीठामुळे मुंबई शहराच्या पर्यटनाला विशेषतः भारतीय पर्यटनाला अत्यंत पोषक राहील, अशी त्यांनी भूमिका मांडली. या महोत्सवात जास्तीत-जास्त कलावंतानी सहभागी व्हावे, याकरिता बृहन्मुंबई महापालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांचे संयुक्तिकरित्या प्रयत्न असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, हे खुले व्यासपीठ विविध कलागुण सादर करणा-या कलावंतांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. पहिल्या दिवसापासूनच अनेक कलावंतानी १९ नोव्हेंबर, २०१७ रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच या कलाकारांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी मुंबई शहराचा सांस्कृतिक वारसा वृद्धिगत करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणा-या विविध क्षेत्रातील नामवंत, प्रतिभावंत कलावंतांनीही या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. दर रविवारी खुले व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे जहांगीर आर्ट गॅलरीसमोरील चौकात भव्य असे खुले व्यासपीठ उभारते आहे. हे खुले व्यासपीठ १८ मे पर्यंत दर रविवारी सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० दरम्यान कलाकारांसाठी उपलब्ध राहणार आहे, असेही ज-हाड यांनी सांगितले.