सोलापूर १३ डिसेंबर (क्री. प्र.) महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर अम्याचूर खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने ५७ वी पुरुष महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा वेळापूर (ता. माळशिरस), सोलापूर येथील पालखी मैदानावर सुरू आहे. पुण्याचे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहचले असून अजिंक्यपदासाठी त्यांना मुंबई उपनगर व ठाण्याशी लढत द्यावी लागणार आहे.
वेळापूरच्या पालखी मैदानावर झालेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या पुण्याने उस्मानाबादला १५-१३ असे १:५० मिनिटे राखून नमविले. मध्यंतराची ७-५ ही तीन गुणाची आघाडीच पुण्यास विजय मिळवून देऊन गेली. अष्टपैलू खेळी करणारी प्रियंका इंगळे (२:३०, २:३० मि. संरक्षण व ५ बळी), ऋतिका राठोड (१:२० मि. संरक्षण व ४ बळी) व स्नेहल जाधव (१:५०, १:३० मि. संरक्षण व ३ बळी) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. उस्मानाबादच्या किरण शिंदे (२:१० मि. संरक्षण), गौरी शिंदे (१:२० मि. संरक्षण व ६ बळी) व जान्हवी पेठे (१:४०, १:१० मि. संरक्षण व २ बळी) यांचे प्रयत्न अपुरे पडले.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात ठाण्याने रत्नागिरीस १४-११ असे हरविले. त्यांच्या रेश्मा राठोड हीने आपल्या धारदार आक्रमणात सात गडी बाद करीत संरक्षणात ३:०० व १:०० मिनिटे पळती केली. त्यामुळेच त्यांना ७-४ अशी आघाडी मिळाली. रुपाली बडे (२:००, १:२० मि. संरक्षण) व गीतांजली नरसाळ (२:००, १:०० मि. संरक्षण) यांनी शानदार खेळ करीत संघाचा विजय सुकर केला. रत्नागिरीच्या अपेक्षा सुतार (२:००, १.:४० मि. संरक्षण व ३ बळी) व आरती कांबळे (२:३०, २:३० मि. संरक्षण ) यांनी कडवी लढत दिली.
पुरुष उपांत्य सामन्यात पुण्याने सांगलीला २२-१८ असे नमविताना चांगलीच त्यांची बरीच दमछाक झाली. पुण्याच्या मिलिंद कुरूपेने ८ व सागर लेंग्रेने ४ गडी बाद करीत अनुक्रमे १:२० व १:३० मिनिटे संरक्षण केल्यामुळे त्यांना मध्यंतरास १२-८ अशी आघाडी मिळाली. अष्टपैलू खेळ करणाऱ्या सांगलीच्या अरुण गुणकी (१.४०, १.४० मि. संरक्षण व ५ गडी) व वसुरज लांडे (१.००,१.३० मि. संरक्षण व ३ गडी) यांचे प्रयत्न अपुरे पडले व परभवाला सामोरे जावे लागले.
पुरुषांच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या मुंबई उपनगरने शेजारच्या ठाण्याला १९-१८ असा १:३० मिनिटे राखून नमविताना कडवी लढत द्यावी लागली. निहार दुवळे (६ गडी), ओंकार सोनवणे (१:५०, १:०० मि. संरक्षण) व अक्षय भांगरे (१:२० मि. संरक्षण व ३ गडी) यांनी मध्यंतरास १०-८ अशी आघाडी मिळवून दिली होती. मुंबई उपनगरने या आघाडीचाच फायदा घेत विजय स्सकरला. तर ठाण्याच्या गजानन शेंगाळने (१:२०, १:१० मि. संरक्षण व २ गडी) कडवी लढत दिली. त्याला जितेश म्हसकर, संकेत कदम व शुभम उत्तेकर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद करत उत्कृष्ट साथ दिली मात्र ते आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत.














