मुंबई, १७ डिसें. (क्री. प्र.) : क्रीडा व युवक सेवा संचंनलाय आयोजित व शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या खेलो इंडिया राज्य खो खो स्पर्धेत लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या मुली संघाने अंतिम फेरीत पुणे विभागाचा १७-९ असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. तर मुलांमध्ये कोल्हापूराने विभागाने पुणे विभागाचा १६-१४ असा निसटता पराभव केला.
मुलींच्या अंतिम सामन्यात उस्मानाबाद विभागाने पुणे विभागाचा १७-०९ असा ८ गुणांनी धुव्वा उडवला. उस्मानाबादच्य्य जान्हवी पेठे (२:००, २:२० मि. संरक्षण व २ बळी), संपदा मोरे (१:४०, २:०० मि. संरक्षण व ३ बळी), अश्विनी शिंदे (२:२०, १:२० मि. संरक्षण व २ बळी) तर किरण शिंदे (नाबाद १:१० मि. संरक्षण व ६ बळी) यांनी केलेल्या बहारदार खेळीने सामना एकतर्फी करत मोठा विजय साजरा केला. तर पुण्याच्या अमृता माने (१:४०, २:०० मि. संरक्षण व १ बळी), प्रणाली काळे (नाबाद १:३०, मि. संरक्षण व १ बळी), शिवानी यड्रावकर (१:०० मि. संरक्षण व २ बळी) यांचाच खेळ बरा झाला. पुण्याचे आक्रमण कमी पडल्यानेच उस्मानाबादला मोठा विजय साजरा करता आला.
मुलांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूर विभागाने पुणे विभागाचा १६-१४ असा २ गुणांनी निसटता पराभव केला. कोल्हापूरच्या ऋषिकेश शिंदे (२:०० मि. संरक्षण व २ गडी), विशाल कुसाळे (२:१० मि. संरक्षण व २ गडी), रोहन कोरे (१:१०, १:१० मि. संरक्षण व ३ गडी) व सुशांत हजारे (१:००, १:१० मि. संरक्षण व २ गडी) यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर विजय मिळवला. तर पुण्याच्या अभिषेक खोमणे ( १:५० मि. संरक्षण व ३ गडी), साहिल चिखले (१:०० मि. संरक्षण व २ गडी), अमित जाधव (१:३० मि. संरक्षण) यांनी जोरदार लढत दिली मात्र ते आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.
भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. प्रा. चंद्रजीत जाधव यांनी खो-खो खेळताना मुलांना होणार्या दुखापती व खेळाडूंना नोकरीत मिळणार्या संधी यांचा विचार करता, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारा खोखोचा प्रचार व प्रसार पाहता खो-खो संघात १२ खेळाडूंऐवजी १५ खेळाडूंचा सहभाग असावा असा ठराव भारतीय खो-खो महासंघाच्या कार्यकारणीच्या सभेत मांडली तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. आता भारतीय खो-खो महासंघ हा प्रस्ताव विधिवत मंजूर करून घेण्यासाठी क्रीडा मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवणार आहे असे जाधव यांनी संगितले.















