जबलपूर, म. प्र; ३१ डिसेंबर, (क्री. प्र.): ५४ वी राष्ट्रीय खुला गट अजिंक्यपद खो-खो स्पर्धा जबलपूर, मध्य प्रदेश येथे संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांनी सुवर्णपदक मिळवताना भारतीय विमान प्राधिकरणाला धूळ चारली होती तर भारतीय रेल्वेने सुसाट खेळी करत महाराष्ट्राला रौप्य पदकावर समाधान मानायला लावले. या स्पर्धेत महिलांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा दिला जाणार्या राणी लक्ष्मीबाई पुरस्कारावर महाराष्ट्राची कर्णधार प्रियांका इंगळेने नाव कोरले. तर पुरुषांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा दिला जाणार्या एकलव्य पुरस्कारावर रेल्वेच्या महेश शिंदेने (नवी मुंबई) नाव कोरले आहे. महिलांमध्ये महाराष्ट्राला २३ वे तर पुरुषांमध्ये रेल्वेला १० वे अजिंक्यपद मिळाले आहे. या वर्षीचे महाराष्ट्राचे हे पाचवे अजिंक्यपद आहे. (सब जूनियर गटाचे दोन व जूनियर गटाचे दोन व खुल्या गटाचे एक अशी पाच अजिंक्यपद मिळाली आहेत.
महाराष्ट्राचे दोन्ही संघ आज महाराष्ट्रात दाखल झाले. जळगाव मध्ये या संपूर्ण चमूचे सहर्ष स्वागत करण्यात आले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते गणपतराव पोळ, जयांनशू पोळ व जळगाव जिल्हा खो-खो परिवारातर्फे मोठ्या जल्लोषात संपूर्ण चमूचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी जळगाव खो-खो परिवाराने सर्वांना भोजन पॅकेट देऊन जल्लोषात निरोप दिला.
जबलपूर येथे झालेल्या 54 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत आतापर्यंतचे 23 वे विजेतेपद मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या महिला संघाचे तसेच उपविजेत्या पुरुष संघाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूला दिला जाणारा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार जिंकलेली महाराष्ट्राची कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह सर्व सहकाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले आहे. महाराष्ट्राचा संघ उपविजेता ठरला असला तरी विजेत्या रेल्वेच्या संघात 12 पैकी 11 खेळाडू महाराष्ट्राचे आहेत, ही बाबही अभिमानाची असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूसाठीचा एकलव्य पुरस्कार जिंकणाऱ्या रेल्वेच्या महेश शिंदे याचे तसेच तृतीय क्रमांक विजेत्या कोल्हापूरच्या पुरुष संघाचेही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. वेग, चपळता, निर्णयक्षमतेचा कस पाहणाऱ्या खो-खो खेळात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मिळवलेले यश हे इथल्या मातीचंच वैशिष्ट्य असल्याचंही उपमुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे महिला प्रक्षिक्षक महेश (मयूर ) पलांडे यांनी महाराष्ट्राचा संघ अजून मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. संघातल्या प्रत्येक खेळाडूने मेहनत घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्पर्धेपूर्वी केलेले नियोजन यशस्वी ठरल्यामुळे समाधान व्यक्त केले. तर पुरूषांचे प्रशिक्षक बिपिन पाटील यांनी दुखापतग्रस्त खेळाडुंमुळे परभवाला सामोरे जावे लागले असल्याचे सांगितले. त्याचबरोबर रेल्वेनेही विजेतेपद राखण्यासाठी जोरदार खेळ केल्याचे सांगितले. पुढच्यावेळी अजून चांगले नियोजन करू असेही त्यांनी स्पष्ट केले.















