३७ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा
रत्नागिरी १७, ऑक्टोबर (क्री. प्र.) : भारतीय खो खो महासंघाच्या व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व रत्नागिरी जिल्हा हौशी खो-खो असोसिएशनच्या अधिपत्याखाली ३७ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर करण्यात आले आहे. आज झालेल्या सामन्यामध्ये उपउपांत्य फेरीत विजय मिळवत पुणे, सांगलीच्या दोन्ही तर ठाणे व उस्मानाबादच्या मुलांच्या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. यजमान रत्नागिरीचा मुलांचा संघ उपउपांत्य फेरीत पराभूत झाला.
उपउपांत्य फेरीचे सामने चुरशीचे झाले. यजमान रत्नागिरीच्या संघाने बलाढ्य पुणे संघाला चांगलेच झुंजवले. या सामन्यात पुण्याने ७ गुणांनी (२०-१३) विजय मिळवला. पुण्यातर्फे सुबोध चव्हाण १.३०, १.४० मिनीटे संरक्षणाचा खेळ करत तिन गडी बाद केले. त्याला अद्वेत बाईतने १.३०, १ मि. संरक्षण करत दोन्ही डावात पाच गडी बाद करून चांगली साथ दिली. शाश्वत थोरातने दोन्ही डावात ५ गडी बाद केले. रत्नागिरीतर्फे अथर्व गराटेने १.१० मि. आणि १.३० मि. संरक्षण करत दोन्ही डावात ८ गडी टिपले. त्याला आशिष बालदेने १.३० मि. खेळ करतानाच २ गडी बाद करुन चांगली साथ दिली. मात्र ते पराभव टाळू शकले नाहीत.
दुसर्या सामन्यात सांगलीने नाशिकचा १ डाव २ गुणांनी (१०-८) पराभव केला. विजयी संघातर्फे वंदोत इनामदार (३.२० मि. संरक्षण), रितेश बिराजदारने (२.१०, १.२० मि. संरक्षण), संग्राम डोंबाळेने (१.३० मि. संरक्षण व ४ गडी) चांगला खेळ केला. नाशिकतर्फे जयेश नगडेने १.२० मि. खेळ केला.
तिसर्या सामन्यात बलाढ्य ठाणे संघाने सोलापूरचा ६.१० मिनिटे राखून १२-१० असा २ गुणांनी पराभव केला. ठाणेतर्फे करण गुप्ता (२.२० मि.), ओमकार सावंत (२.००, १.०० मि. संरक्षण व २ गडी) चमकदार कामगिरी केली. सोलापूरकडून महिबुब मज्जाने (१.४० मि. व १ गडी) चांगला खेळ केला.
चौथ्या सामन्यात उस्मानाबाद संघाने सातार्याचा १ डाव आणि ८ गुणांनी (१५-७) सहज पराभव केला. विजयी संघातर्फे राज जाधव (२.१० मि. संरक्षण व २ गडी), जितेंद्र वसावे (३ मि. व ४ गडी), सोत्या वळवी (२.१० मि. व ६ गडी) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
किशोरी गटातील सामन्यात सांगलीने सोलापूरचा १ गुण आणि ५ मिनिटे ५० सेकंद (११-१०) राखून पराभव केला. विजयी संघातर्फे स्वप्नाली तामखडे (१.१०, २.०० मि. व १ खेळाडू), विद्या तामखडे (१.००, १.३० मि. आणि १ खेळाडू), समीक्षा शिंदेने (१.४०, २.०० मि. आणि १ खेळाडू) असा खेळ केला. सोलापूरकडून स्नेहा लामकाने (२.२०, १.००, १.४० मि. आणि १ खेळाडू) चांगला खेळ केला.
दुसर्या सामन्यात पुण्याने सातार्याचा १ गुण आणि ४ मि. ४० सें. राखून (११-१०) पराभव केला. विजयी संघातर्फे आर्या वाघने (३.१०, १.३० मि. व १ खेळाडू), श्वेता नवलेने (२.५० मि. आणि २ खेळाडू)
—
पावसाचा व्यत्यय
किशोर गटातील उपांत्यपुर्व फेरीतील रत्नागिरी विरुध्द उस्मानाबाद हा सामना सुरु असतानाच पावसाला सुरवात झाली. रत्नागिरीच्या मुलींनी आक्रमणामध्ये सात मिनिटात ७ गडी बाद केले होते. दुसरा डाव सुरु होत असतानाच मुसळधार पावसाला सुरवात झाली. हा सामना थांबविण्यात आला.