
रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यालाही आज पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसाने जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी व नारंगी या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नद्यांच्या लगत असलेली शेती व वीट भट्ट्या पाण्याखाली गेल्या आहेत. ह्या पावसाचा जोर कायम राहील्यास ग्रामिण भागात जाणारे मार्ग बंद होण्याची दाट शक्यता आहे. पावसाचा जोर वाढत असुन, ग्रामिण भागात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झालेला आहे. संततधार पावसामुळे खेड मटण -मच्छी मार्केट परिसरात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी घुसले. त्यामुळे मच्छीमार्केट परिसरातील व्यापार्यांची एकच धांदल उडाली. तेथील व्यापार्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी बोटींचा वापर केला. आज सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास येथील प्रांताधिकारी सौ.राजेश्री मोरे व तहसिलदार सौ.प्राजक्ता घोरपडे यांनी देखील खेड शहर आणि परिसरातील आपद्ग्रस्त भागाची पहाणी केली. त्यानुसार त्यांनी तेथील स्थानिक नागरिकांना आवश्यकती काळजी घेण्याच्या सुचना केल्या.
सद्या जगबुडी नदी धोक्याच्या पातळीने वाहत आहे. नदी किनार्यावर मासे मारी करणार्यासाठी कोणीही जावू नये अशा सुचना करण्यात आल्या आहेत. तर पावसामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतुक देखील धिम्या गतीने सुरू आहे.















