रत्नागिरी । गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर कोकणात दाखल झालेले चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मात्र मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे खचाखच भरून येत असल्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. खेड रेल्वे स्थानकावरही आज असाच प्रकार घडला. प्रवाशांकडून गाडीवर दगडफेकही करण्यात आली.
मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यानी मोठ्या प्रमाणावर खेड रेल्वे स्थानकात गर्दी केली आहे. मडगाव येथून मुंबईकडे जाणारी गाडी क्रमांक 10104 मांडवी एक्स्प्रेस खेड रेल्वे स्थानकात न थांबता पुढे गेल्याने प्रवाशानी संताप व्यक्त केला. खेड रेल्वे स्थानकातून अनेक प्रवाशांनी परतीचे आरक्षण केले होते. मात्र मांडवी एक्स्प्रेसने नियमित खेड थांबा असतानाही न थांबल्याने तिची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना गाडीत चढता आले नाही. संतप्त झालेल्या प्रवाशांनी स्टेशन मास्तर केबिनकडे धाव घेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान रेल्वे पोलीस व खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानी प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रवाशांनी तिकिटे खरेदी करूनही मांडवी एक्सप्रेस न थांबल्याने मुंबईकडे जायचे कसे असा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान गणपती स्पेशल हॉलिडे एक्स्प्रेस खेड स्थानकात दाखल होणार असून त्यातून प्रवाशांना पाठवण्यात येईल असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. मात्र ही हॉलिडे एक्स्प्रेसही प्रवाशांनी खच्चून भरली होती. पाय ठेवायलाही डब्यात जागा नव्हती. त्यामुळे प्रवाशांचा उद्रेक झाला. आणि गाडीवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनाही जमाव आवरत नव्हता. अखेर सर्व गाड्या खेड रेल्वे स्थानकात येतील असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं.