रत्नागिरी, (आरकेजी) : खेड तालुक्यातील ऐनवली येथून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय युवतीचा मृतदेह शनिवारी खेड- आंबवली मार्गावरील पेंढरीच्या नदीपात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अंकिता सुनिल जंगम असे त्या युवतीचे नाव असून सद्यस्थितीत पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. युवतीच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. खेड पोलिसांनी या प्रकरणी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अंकिता बुधवार रात्रीपासून बेपत्ता होती. शुक्रवारी खेड पोलिस ठाण्यात तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. आज संशयास्पद स्थितीत तिचा मृतदेह आढळून आल्याने तिच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता. याप्रकरणी खेड पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक डॅनीयल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. नामदेव जाधव करीत आहेत.