कोविशिल्ड प्रतिमात्रा ७८० रुपये; कोवॅक्सिन प्रतिमात्रा १ हजार ४१० रुपये
- स्पुटनिक व्ही प्रतिमात्रा १ हजार १४५ रुपये
- ५ टक्के वस्तू व सेवा कर आणि १५० रुपये सेवा शुल्काचाही समावेश
- निर्धारित दरांपेक्षा जास्त रक्कम आकारल्यास होणार कारवाई
- तक्रार नोंदविण्यासाठी महानगरपालिकेकडून इ-मेल आयडी उपलब्ध
Mumbai : कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण राष्ट्रीय मोहीम अंतर्गत, अधिकाधिक नागरिकांना लस देता यावी यासाठी खासगी रुग्णालयांना सशुल्क लसीकरणाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी लस उत्पादकांनी ठरवलेले उत्पादन दर आणि त्यावर लागू होणारे कर हे सर्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने कोविड लसींचे कमाल दर निर्धारित केले आहेत. या दरांनुसारच खासगी रुग्णालयांनी आकारणी करावयाची असून त्याचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबतची तक्रार नोंदविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने complaint.epimumbai@gmail.com हा इ-मेल आयडी उपलब्ध करुन दिला आहे.
राष्ट्रीय कोविड-१९ लसीकरण कार्यक्रम हा दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात टप्प्या-टप्प्याने राबविण्यात येत आहे. मुंबईतील शासकीय तसेच महानगरपालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शासकीय तसेच महानगरपालिका केंद्रात विनामूल्य लसीकरण केले जात आहे तर खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क लस देण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या मुक्त धोरणानुसार खासगी लसीकरण केंद्र लस उत्पादकाकडून लस खरेदी करून नागरिकांचे सशुल्क लसीकरण करू शकतात. यासंदर्भात दिनांक ८ जून २०२१ रोजी केंद्र सरकारने खासगी लसीकरण केंद्राने लाभार्थ्याकडून आकारण्याचे दर निश्चित केले आहेत. या अनुषंगाने लस उत्पादकाने दिलेला दर तसेच अधिक ५ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि जास्तीत जास्त १५० रुपये सेवाशुल्क खासगी लसीकरण केंद्र लाभार्थ्याकडून घेऊ शकतात.
याअनुषंगाने लसनिहाय दरनिश्चिती खालीलप्रमाणे आहे.
क्रम | लसीचे नाव | लस उत्पादकाने
घोषित केलेला दर (रुपये) |
५ टक्के जीएसटी (रुपये) | कमाल सेवाशुल्क (रुपये) | कमाल
निर्धारित दर (रुपये) |
१ | कोविशिल्ड | ६०० | ३० | १५० | ७८० |
२ | कोवॅक्सिन | १२०० | ६० | १५० | १,४१० |
३ | स्पुटनिक-व्ही | ९४८ | ४७ | १५० | १,१४५ |
सरकारने निश्चित केलेल्या या दरांमध्ये बदल झाल्यास वेळोवेळी नागरिकांना कळविण्यात येईल.
यास्तव खासगी लसीकरण केंद्रांना कळविण्यात येते की, वर नमूद केलेल्या दरानुसारच लाभार्थ्यांकडून लसीकरण शुल्क आकारण्यात यावे. अवाजवी शुल्क आकारण्यात आल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी.
नागरिक, गृहसंकुल पदाधिकारी तसेच औद्योगिक संस्था प्रमुखांनी सदर लस दर निश्चितीची नोंद घ्यावी. अवाजवी दर आकारण्यासंदर्भातील तक्रार complaint.epimumbai@gmail.com या ई-मेलवर नोंदविण्यात यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.