शिवसेनेशी लढण्यासाठी राणे किंवा अन्य कोणाचा वापर करायचं ठरवलं असेल तर तो त्यांचा भ्रमनिरास आहे – खासदार विनायक राऊत
रत्नागिरी, प्रतिनिधी : कोकणातल्या लोकांनी आपलं आणि शिवसेनेचं नातं अभेद्य आहे हे सिद्ध करून दाखवून दिलेलं आहे. आज नारायण राणे सूक्ष्म खात्याचे मंत्री असोत किंवा त्यांना उद्या पंतप्रधान बनवलं तरी तरी सुद्धा कोकणातून शिवसेनेला हटविणं हे कोणाच्याही ऐपतीमध्ये नाही. कोकण आणि शिवसेना हे अभेद्य नातं तोडण्याचं काम कोणीही करू शकत नाही, असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे, ते आज रत्नागिरीत बोलत होते.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कालच झालेला आहे. महाराष्ट्रातून चार जणांची वर्णी या मंत्रिमंडळात लागली असली तरी महाराष्ट्रातीलच दोन जणांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. याबाबत खासदार विनायक राऊत म्हणाले की, एवढ्या मोठ्या महाराष्ट्राला केंद्रीय मंत्रिमंडळात फक्त चार मंत्रीपद मिळतात हेच मोठं दुःख आहे. ते मिळत असताना प्रकाश जावडेकर यांच्यासारखा कार्यक्षम मंत्री बाहेर जातो याचं दुःख फार मोठं आहे. तसेच महाराष्ट्राला मंत्रिपद देत असताना अन्याय झालेला असल्याचंही राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान शिवसेनेशी लढण्यासाठी ज्यांची ताकद नाही अशांनी एखाद्या नारायण राणे किंवा अन्य कोणाचा वापर करायचा ठरवलं असेल तर तो त्यांचा भ्रमनिरास आहे. पराभव काय असतो ते यापूर्वी अनेक वेळा शिवसेनेने नारायण राणेंना दाखवून दिलं असल्याचं सांगत खासदार राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपवर टीका केली आहे.
दरम्यान मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर राणेंना मंत्रिपद देण्यात आलं का, यावर बोलताना राऊत म्हणाले की, मुंबई महालापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले. पण मुंबई आणि शिवसेना यांचं जे नातं आहे हे अभेद्य नातं मागच्या 30 वर्षांपासून आहे. येत्या निवडणुकीत सुद्धा शिवसेना आणि महाविकास आघाडीचाच भगवा मुंबई महापालिकेवर फडकेल, तो उतरविण्याची ताकद कोणामध्ये नसल्याचं खासदार राऊत यावेळी म्हणाले.