मुंबई : “सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी, जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रत्येक खासदाराने १५० किलोमीटरची पदयात्रा काढावी” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला अनुसरून उत्तर मुंबईचे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या पदयात्रेला प्रारंभ केला आहे. “यंदाचे वर्ष हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे वर्ष असून ही १५० किमीची पदयात्रा म्हणजे त्यांना आमची आदरांजली आहे”, असं मत खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केलं. आज दहिसरमधून या पदयात्रेचा दुसरा टप्पा सुरू करताना शेट्टी बोलत होते.
“भाजप सरकारने काश्मीरबाबतचं कलम ३७० रद्द केल्यामुळे देशात चैतन्याची लाट उसळली आहे. देशाविषयीचा स्वाभिमान अगदी सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण व्हावा, सरकारी योजनांची- उपक्रमांची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ आॅगस्ट रोजी ह्या पदयात्रेचा पहिला १० किमीचा टप्पा आम्ही बोरिवली विधानसभेत पूर्ण केला. आजच्या दुस-या टप्प्यात दहिसरमध्ये या पदयात्रेत असंख्य नागरिकसुद्धा सहभागी झाले, याचा मला विशेष आनंद वाटतो”, असंही खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितलं.
दहिसरमधील पदयात्रेत दहिसरच्या आमदार मनीषाताई चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष विनोद शेलार, मुंबई उपाध्यक्ष श्रीकांत पांडे, करूणाशंकर ओझा आदी मान्यवर आणि शेकडो नागरिक सहभागी झाले होते. “येत्या तीन आठवड्यात उत्तर मुंबईतील १५० किमीची पदयात्रा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट्य आम्ही बाळगलं आहे”, असंही शेट्टी यांनी सांगितलं.