रत्नागिरी : आपली वाटचाल घोटाळ्यामध्ये घालवणार्यांनी मला गोष्टी शिकवू नयेत, खंबाटा एम्प्लॉइज क्रेडिट सोसायटी ही कोणाच्या ताब्यात होती, करारावर किती संघटनांच्या प्रतिनिधींच्या सह्या होत्या हे आधी आपल्या बंधूना विचारावं असा टोला लगावत खंबाटा प्रकरणावरून निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्त्युत्तर दिले. ते आज रत्नागिरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी खंबाटा प्रकरणावरून राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. राऊत यांनी 2700 कामगारांना देशोधडीला लावून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राणे यांनी केला होता. तसेच नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत विकासकामांवरून लक्ष केलं होतं. या आरोपांचे खंडन करताना खासदार विनायक राऊत म्हणाले की खंबाटा एव्हीएशनमध्ये 3 कामगार संघटना कार्यरत होत्या. त्यामध्ये भारतीय कामगार सेना, महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना, आणि ऑफिसर्स असोसिएशन संघटना यांचा समावेश होता. 2010 आणि 2014 मध्ये करार झाले, त्यावेळी त्या करारांवर महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या अध्यक्षांची देखील सही होती. ही समर्थ कामगार संघटना कोणाची आहे हे सर्वश्रुत आहे. निलेश राणे यांनी आरोप करण्यापूर्वी आपल्या बंधूंकडून त्याबाबत व्यवस्थित माहिती घ्यावी आणि मगच आरोप करावेत असा टोला खासदार राऊत यांनी यावेळी दिला.
खंबाटा एम्प्लॉइज क्रेडिट सोसायटी ही महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेकडे होती. कामगारांची देणी या क्रेडिट सोसायटीत अडकली आहेत. ही देणी मिळवण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू असल्याचे सांगून व्यवस्थापणाचा बेशिस्तपणा आणि मालकाचं दुर्लक्ष यामुळेच खंबाटा बंद पडल्याचे राऊत यांनी सांगितले.
मला कोणाच्या आरोपांना उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही, आपली वाटचाल घोटाळ्यामध्ये घालवणार्यांनी मला गोष्टी शिकवू नयेत, मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या ठिकाणी प्रमाणिकपणेच काम करतो असे खडेबोल राऊत यांनी सुनावले.
गद्दारी व बेईमानी राणेंच्या नसानसात भिनलेली – विनायक राऊत
खासदार नारायण राणेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना राऊत म्हणाले की राणेंना राज्यसभेत जाऊन एक वर्ष झाले या एक वर्षांत तुम्ही किती वेळा तोंड उघडलेत, डीबेटचा रेशो शून्य असल्याचे सांगत राज्यसभेत तुम्ही काय दिवे लावलेत असा सवाल उपस्थित केला.
शिवसेना भाजपचा आतून पाठींबा असल्याच्या राणेंच्या वक्तव्यावर टीका करताना ते म्हणाले की राणेंच्या या भूलथापा नेहमीच्याच आहेत. सेना, भाजप, आरपीआय, रासपमध्ये गद्दारी व बेईमानी नाही ती राणेंच्या नसानसात भिनलेली आहे. उमेदवारी अर्ज भरताना आमचा उद्देश शक्तिप्रदर्शन करण्याचा नव्हता, तर आपुलकीपोटी आलेला जनसमुदाय होता, आम्हाला ही निवडणूक विकासावर लढवायची आहे, त्यामुळे बेछूट आरोपांना ऊत्तर देणे आम्हाला गरजेचे वाटत नसल्याचे राऊत म्हणाले.
इन्कमटॅक्समध्ये चपराशीची नोकरी केलेल्या माणसाने सेल्सटॅक्समध्ये स्टेनोग्राफीची नोकरी केलेल्याला शिक्षणाबद्दल विचारू नये — राऊत
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी सोमवारी पक्षाच्या जाहीर सभेत खासदार विनायक राऊत हे दोनदा नॉन मॅट्रिक असल्याचं सांगत जोरदार टीका केली होती. या टीकेला आज प्रत्युत्तर देत राऊत यांनी राणेंचा खरपूस समाचार घेतला.
मी दोनदा मॅट्रिक्युलेट झाल्याचा आरोप या राज्याचे विद्वान राजकीय नेते नारायणराव राणे यांनी केला आहे. या मॅट्रिक्युलेट शब्दाचं स्पेलिंग सुद्धा त्यांना लिहिता येणार नाही याची मला खात्री आहे. मात्र आपल्या आयुष्याची अनेक वर्षे इन्कमटॅक्समध्ये चपराशीची नोकरी करत घालवली त्या माणसाने सेल्सटॅक्समध्ये स्टेनोग्राफीची नोकरी केलेल्या विनायक राउतला त्याच्या शिक्षणाबद्दल विचारण्याची घोडचूक भविष्यात करू नये असा इशारा विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना यावेळी दिला.