मुंबई : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील राज्य महामार्ग, राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने www.mahapwd.com या संकेतस्थळावर तक्रार प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी खड्डे असलेल्या रस्त्यांची माहिती, फोटो या संकेतस्थळावर अपलोड करावे, जेणेकरून त्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात येईल असे आवाहन विभागाने केले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात आलेल्या तसेच देखभाल दुरुस्ती करण्यात येणाऱ्या राज्य महामार्ग, राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आढळल्यास त्याची तक्रार करण्यासाठी विभागाच्या संकेतस्थळावर grievance portal प्रणाली सुरू केली आहे. यामध्ये रस्त्याचे नाव, जिल्हा, खड्ड्यासंदर्भातील तक्रारीचा तपशील, शक्य असल्यास फोटो देण्यात यावे. तसेच तक्रारकर्त्यांनी आपले नाव, पत्ता, ईमेल आदी माहितीही द्यावी. तक्रार प्राप्त झाल्यानंतर विभागाकडून खड्डे बुजविण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे. तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आल्याचेही सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.