नवी मुंबई : कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांवर केलेले खड्ड्यांच्या डागडुजीचे काम परतीच्या पावसात वाहून गेले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांना खड्ड्यांनी व्यापले आहे. रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. वाहनचालकांना या खड्ड्यांमुळे मान आणि पाठीच्या विकारांनीही ग्रस्त केले आहे. त्यामुळे अस्थितज्ज्ञ डॉक्टरांकडे धाव घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. यामध्ये नवी मुंबई व ठाणे येथील रिक्षा चालक तसेच खासगी वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांचा समावेश आहे. येत्या काळात अशा विकारांमध्ये वाढ होणार आहे अशी भीती वाशी येथील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक क्लिनिकने व्यक्त केली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक शल्य चिकित्सक डॉ. शैलेंद्र पाटील म्हणाले, “मुंबई, नवी मुंबई व ठाणे शहरांत राहणाऱ्या नागरिकांमध्ये हाडांना होणारा कॅल्शियमचा अपुरा पुरवठा, सूर्यप्रकाशाचा अभाव यांच्यामुळे या हाडांची झीज होण्याचे प्रमाण अधिक आहे.त्यातच रस्त्यांवरील खड्यांमुळे हाडांच्या दुखापतीत भर पडली आहे. खड्ड्यांतून रोजचा प्रवास करताना अनेकांच्या गाड्यांना झटके बसत असल्याने, २० ते ३० टक्के रिक्षाचालकांना पाठ, पाय, तसेच मणक्यांवरील विविध प्रकारच्या आघातांना सामोरे जावे लागते. चार चाकी वाहन सुरक्षित मानले, तर त्यामध्येही खड्ड्यांमुळे पायांवर येणारा ताण स्नायूंवर भार टाकतो; त्यातूनही पायांच्या हाडांमध्ये दोष निर्माण होतो. पाठ, कंबर, मणक्यातील अवयवांची ठेवण ही मज्जारज्जूशी संबंधित असते प्राथमिक टप्प्यावर फिजिओथेरपीने ती बरी करण्याचा प्रयास केला गेला तरीही अनेकदा हाडांना इतकी दुखापत झालेली असते, की त्यावर शस्त्रक्रियेशिवाय दुसरा उपाय नसतो.”
वाशी ते नेरुळ दरम्यान रोज रिक्षा चालवीत असलेले अजित पाटील सांगतात गेल्या दोन महिन्यात माझ्या पाठीच्या दुखण्यात वाढ झाली असून आतापर्यंत मी ७ ते ८ वेळा डॉक्टरकडे गेलो असून डॉक्टरांनी मला संपूर्ण आरामाचा सल्ला दिला आहे परंतु घर चालविण्याची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मी जास्त दिवस आराम करू शकत नाही. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वैद्यकीय खर्चात वाढ झाली आहे व त्यामुळे घर चालविणे जिकरीचे होत आहे.
विशेष म्हणजे रस्त्यांवरील खड्डे, स्पीड ब्रेकर, बांधकाम सुरू असलेल्या किंवा दुरुस्ती सुरू असलेल्या रस्त्यांवर होणार्या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली असून महाराष्ट्रात हा आकडा ७०० टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. २०१५ मध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे देशभरात ३४१६ मृत्यू झाले. २०१४ मध्ये हा आकडा ३०३९ इतका होता. खड्ड्यांमुळे होणार्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वाढ झाली आहे.