डोंबिवली (प्रशांत जोशी): कल्याण-डोंबिवलीतील खराब व निकृष्ट दर्जाची कामे झालेली रस्ते आयुक्तांच्या रडारवर आली आहेत. या रस्त्यांवर मागील पाच वर्षात कंत्राटदारांनी केलेल्या कामाच्या चौकशी करण्यात येणार आहे. तसेच ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहे, अशा रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजविण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत
कल्याण – डोंबिवली रस्त्यांची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे चाळण झाली असून अपघात होत असतात. याची गंभीर दखल घेवून रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कानउघडणी केली. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सहा महिन्यातच खराब झालेल्या रस्त्यांचे फोटो पुरावे आयुक्तांसमोर खा. डॉ. शिंदे यांनी सादर केले. यावेळी गेल्या पाच वर्षात कल्याण डोंबिवली महानागर पालिका क्षेत्रात झालेल्या सर्व रस्त्यांच्या कामांची तसेच संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांची तातडीने चौकशी करण्याचे आश्वासन आयुक्त पी. वेलरासु यांनी खासदार डॉ.शिंदे यांना दिले. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याकरता १२ कोटींचे बजेट महापालिकेने मंजूर केले असून १२ अभियंते आणि ६ एजेंसी पालिकेकडे आहेत. तातडीने कामाला लावून १२ ठिकाणी हे काम युद्धपातळीवर सुरु करावे, अशी सूचना खा.डॉ. शिंदे केली. दरम्यान पालिका अधीक्षक अभियंते नाना पवार यांनी त्वरित दुरुस्तीची काम सुरू करण्याची ग्वाही दिली.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिका आयुक्त पी वेलारासु यांच्याकडे खड्डेमय रस्त्यांबाबत विचारणा केली. यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर,जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, स्थायीसमिती सभापती रमेश म्हात्रे,महानगरप्रमुख विजय साळवी, शहर प्रमुख भाऊसाहेब चौधरी,परिवहन सभापती संजय पावशे, गटनेता रमेश जाधव, नगरसेवक दीपेश म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, मुकेश पाटील, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, पीडब्ल्यूडीचे अधिकारी उपस्थित होते.