रत्नागिरी : कोकणातील महत्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव. त्यामुळे मुंबई-पुण्यातून दरवर्षी लाखो चाकरमानी आपल्या गावी खास गणेशोत्सवासाठी येत असतात. पण प्रवासासाठी चाकरमान्यांची मदार असते, ती मुंबई-गोवा महामार्गावर. गेल्या दोन महिन्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, तर अनेक ठिकाणी घाटातच रस्ता खचला आहे. कशेडी घाटात तर भोगाव इथे 100 मीटर परिसरातील रस्ता दोन ते चार फुटाने खचला आहे. सध्या या ठिकाणी काम सुरू असून रस्ता सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे इथली वाहतूक सध्या एकेरी सुरू आहे. दरम्यान आगामी गणेशोत्सवाच्या दृष्टीने आज खासदार सुनील तटकरे यांनी या घाटाची पाहणी केली.
सध्या कशेडी घाटात खचलेल्या रस्त्यावर एका मार्गावर भराव टाकून वाहतुक सुरळीत सुरु करण्याचा प्रयत्न केला गेलाय. तर दुसरीकडे या ठिकाणी पुल बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना दिल्या गेल्यात. तर या रस्त्याला लागून असलेल्या मोठ्या दरडींच्या मागून मार्ग काढता येईल का या संदर्भात विचार करण्याच्या सुचना खासदार सुनील तटकरे यांनी दिल्यात. तर या भागाचा भुगर्भीय तंज्ञाकडून सर्व्हे करण्याच्या सुचना दिल्या गेल्यात.