रत्नागिरी दि.22:- भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चा भाग म्हणून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधून पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, आयोजित सांस्कृतिक कार्य मंत्रालय महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, सर जे.जे. स्कुल ऑफ आर्ट आणि मध्य दक्षिणी क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जुलै ते 25 जुलै या दरम्यान एम.टी.डी.सी. पर्यटक निवास गणपतीपुळे येथे ‘केसरी उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवात देशभरातून 75 चित्रकार आपली कला सादर करणार आहेत.
या उत्सवाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी रत्नागिरी डॉ. बी .एन. पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास अधिष्ठाता जे. जे. स्कूल ऑफ आर्ट प्राचार्य विश्वनाथ साबळे, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक एम.टी.डी.सी. संजय ढेकणे, जेष्ठ चित्रकार दिलिप कदम, सत्यपाल टी. ए., अनिल नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.