
मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेपासूनच ईडी, सीबीआय व केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून आस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न राहिलेल्या आहे आणि या पाच-सहा दिवसांच्या घडामोडीनंतर हे कटकारस्थान उघड झाले आहे, याचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने निषेध केला आहे.
राज्यातील आघाडीचे सरकार सत्तेवरून खाली खेचण्याकरिता केंद्र सरकारच्या अधिकारातील केंद्रिय तपास यंत्रणांचा बेकायदेशिर वापर करूनही हे सरकार अडीचवर्ष सत्तेवर राहिले. हे सरकार टिकून राहणे भाजपला अडचणीचे वाटत असल्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या शिवसेना पक्षाला लक्ष्य करून मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत शिवसेनेतील फुटीर गटाला तसेच अपक्ष काही आमदारांना हाताशी धरून भाजपच्या केंद्रिय सत्तेने व राज्य नेतृत्वाने सर्वोतोपरी केलेले सहकार्य या पाच-सहा दिवसात घडत असलेल्या घटनांवरून स्पष्ट झाले
आहे, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य कौन्सिलने केला आहे.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री शिवसेनेचेच असताना शिवसेनेतील फुटीर गटाला आपलेच सरकार पाडण्याची दुर्बुद्धी का व्हावी हा प्रश्न आहे. महाविकास आघाडीतील इतर राजकीय पक्ष मुख्यमंत्री ठाकरे यांना आपले समर्थन असल्याचे जाहीर करीत असताना शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री मात्र भाजपच्या कुटील डावपेचाला बळी पडले आहेत. केंद्रातील भाजप सरकारचा व्यवहार प्रांताचे सरकार येनकेन प्रकारे पाडण्याचा प्रयत्न हा लोकशाही पद्धतीला हानिकारक आहे, असे म्हणत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य कौन्सिलने भाजप केंद्रिय सरकार व राज्य नेतृत्वाकडून होणाऱ्या लोकशाही व संविधान विरोधी कृतिचा तीव्र निषेध केला आहे.















