मुंबई, (निसार अली) : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात मच्छिमार संघटना एकवटल्या असून उद्या मंगळवारी व्यापारी जहाज रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुसार पालघर-ठाणे-मुंबई-रायगड-रत्नागिरीचे मच्छिमार ससून डॉक, मुंबई येथे येणा-या-जाणा-या व्यापारी जहाजांना 400 ते 500 मासेमारी नौकांनी घेराव घालून केंद्र सरकारचा निषेध करणार आहेत.
नौकानयन वाहतूक मंत्रालयाची (डी.जी.शिपींग) सागरमाला योजना प्रस्तावित आहे. त्या अंतर्गत शिपींग व्यापारी जहाजाकरिता जख्यू- गुजरात ते कन्याकुमारी- तमिळनाडु सागरी क्षेत्रात 15 ते 35 नॉटीकल मैल परिसरात समुद्रामध्ये प्लॉट टाकण्यात येणार आहे. त्यामुळे सागरीमार्ग राखीव करून सदर क्षेत्रात मासेमारी करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. याविरोधात मच्छिमार संघटना मुंबईत ससून डॉक येथे मासे विक्री बंद करणार आहेत. घेराव घातल्यानंतर केंद्र सरकारचा निषेध करणार आहेत. नंतर ससून डॉकमध्ये जाहीर सभा घेण्यात येईल. तसेच रत्नागिरी जिल्हा मच्छिमार संघाच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हाधिकारी व श्रमिक मच्छिमार संघटना हे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे अंदोलन करतील. हे आंदोलन एकाच दिवशी सर्व सागरी राज्यात होणार आहे. सदर आंदोलनाची माहीती मत्स्यव्यसाय मंत्री, मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री, खासदार यांना देण्यात आली असल्याची माहिती किरण कोळी यांनी दिली. एनएफएफ अध्यक्ष नरेंद्र पाटील, लिओ कोलासो, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष जनार्दन तांबे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. यात मच्छीमारांच्या विविध संस्था संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत.