मुंबई: मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या धर्तीवर कोकणात सुजज्ज रुग्णालय निर्माण करावे, अशी मागणी कुणबी युवा मुंबई संचालित वैद्यकीय विभागाने केली आहे. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना या मागणीचे कोकणवासीयांच्यावतीने नुकतेेच निवेदन देण्यात आले. मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करु, प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशारा ही कुणबी युवांच्यावतीने देण्यात आला.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे या जिल्ह्यात आजही मोठे सरकारी हॉस्पिटल नाही. सरकारी दवाखाने, जिल्हा रुग्णालये व्हेंटिलेटरवर आहेत. काही खाजगी आणि सरकारी दवाखातील डॉक्टर सर्वसामान्यांची लूट करतात. वेळेत उपचार होत नसल्याने व अखेरच्या क्षणी रुग्णला इतरत्र हलविण्याचा सांगण्यात येते. परिणामी अर्ध्या रस्त्यातच रुग्ण दगावतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन, मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या धर्तीवर कोकणात भव्य आणि सुजज्ज असे हॉस्पिटल निर्माण करावे, अशी जोरदार मागणी कुणबी युवाने केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी कुणबी संघाध्यक्ष भूषण बरे, कुणबी युवा वैद्यकीय विभागाचे सल्लागार प्रदीप मोगरे, कुणबी युवाध्यक्ष माधव कांबळे, रोजगार प्रमुख सुरज सोलकर, शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विजय वीर, आदी उपस्थित होते.