डोंबिवली, (प्रशांत जोशी) : कल्याण डोंबिवली महानगर पालिका डोंबिवली विभागीय कार्यालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील प्रभाग समिती सभापती कार्यालयासमोरील छत दुपारी अचानक कोसळले. या घटनेमुळे थोडा वेळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. परंतु सुमारे अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली डोंबिवली विभागीय कार्यालय इमारत काही कालावधीत खाली करण्यात येणार असून इमारतीतील खाती इतरत्र हलविण्यात येणार असल्याची महिती समोर येत आहे.
पूर्वेकडील इंदिराचौक शेजारी महापालिकेची डोंबिवली विभागीय कार्यालयाची सध्याची इमारत डोंबिवली नगरपालिका परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आली होती. इमारतीचे उद्घाटन 19 ऑगस्ट 1970 रोजी आमदार बाळासाहेब देसाई यांच्या शुभहस्ते झाले होते. या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान तत्कालीन आमदार विधानपरिषद विरोधीपक्ष नेते उत्तमराव पाटील यांनी भूषविले होते. त्यावेळी डोंबिवली नगरपालिका परिषदेचे अध्यक्ष म्हणून वि.शं. तथा दाजीसाहेब दातार आणि नगरपालिका मुख्याधिकारी म्हणून दा.रा. गाडगीळ कार्यरत होते. इमारतीचे वास्तुविशारद म्हणून ‘शिल्पसाधना’ डोंबिवली आणि वास्तुरचनाकार पी.एस. म्हात्रे अँड सन्स यांनी काम पाहिले होते. आज या घटनेला सुमारे अठ्ठेचाळीस वर्षे होत असून इमारत कुमकुवत झाल्याचे निष्पन्न होत आहे.
डोंबिवली विभागीय कार्यालयात ‘ग’ आणि ‘फ’ प्रभागक्षेत्र कार्यालये असून नागरी सुविधा केंद्र माध्यमांतून करदात्या नागरिकांची कामे होत असतात. तळमजला अधिक दोन मजली इमारत असून इमारतीमध्ये विवाह नोंदणी, जन्म-मृत्यू नोंद आदी कामे होत असतात. मंगळवारी दुपारी जेवण्याच्या सुटीत अचानक इमारतीचे पहिल्या मजल्यावरील छत कोसळल्याने धावपळ झाली. संबंधित खात्याचे कर्मचारी घटनेवेळी काम करीत होते. परंतु घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
याबाबत प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार इमारत जुनी झाली असल्यामुळे येथील खाती हलविण्याची पर्यायी व्यवस्था प्रशासनाने केली असून तशी तयारी सुरु आहे. इमारतीत असलेल्या प्रभाग क्षेत्रानुसार प्रभाग अध्यक्ष, लेखा, आस्थापना, बांधकाम विभाग, प्रभागक्षेत्र अधिकारी, आरोग्य, कर आकारणी, अनधिकृत बांधकाम – फेरीवाले आदी खात्यामाध्यमातून काम चालते. सुमारे प्रत्येक प्रभाग क्षेत्रात सुमारे 6 अधिकारी व अधिक्षक, 130 कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय बांधकाम – फेरीवाले कामगार वर्ग, विद्युत, सुरक्षा विभाग, पोलीस, पाणीपुरवठा, कार्यकारी अभियंता, बांधकाम, प्रोजेक्ट या खात्याचे अधिकारी – कर्मचारी पत्रकार कक्ष अशा सुमारे 500 अशा मोठ्या संख्येने डोंबिवली विभागीय कार्यालय सद्य स्थितीत सुरु आहे.
‘ग’ प्रभागक्षेत्र खाते महापालिकेच्या ताब्यात असलेल्या पी.पी. चेम्बर्स इमारतीत हलवणार असून सुनीलनगर येथील बहिणाबाई गार्डन मधील पालिकेच्या जागेत ‘फ’ प्रभागक्षेत्र हलविणार अशी माहिती प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी दिली.