डोंबिवली: कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत ती २७ गावे समाविष्ट झाली असली तरी तेथील नागरिकांच्या समस्या चौपट वाढत आहेत. गावागावात कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत असून शहराजवळ असणाऱ्या औद्योगिक विभागातील परिस्थिती जैसे थे अशीच आहे. मुख्य म्हणजे औद्योगिक विभागात एमआयडीसी प्रशासनाच्या अंधाधुंध कारभारामुळे कचऱ्याचे समस्या वाढत आहते. नालेसफाई करूनही नाले पुन्हा कचऱ्याने तुडुंब वाहत आहेत याला जबाबदार एमआयडीसी आहे असा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधी करीत आहेत. मात्र आम्हीच पूर्वी नाले सफाई पूर्णपणे करीत होतो असे वक्तव्य एमआयडीसी अधिकारी करीत आहेत.त्या २७ गावांपैकी भोपर, कोळे, निळजे, काटई, सोनारपाडा, दावडी आदी परिसरातील नालेसफाई काम सुरु आहे. या सफाई कामासाठी ७० कामगार काम करीत आहेत. या कामासाठी एक पोखलन आणि चार जेसीपी माध्यमातून ७ कि.मी. मोठ्या नाल्यांची सफाई होत आहे अशी माहिती स्थानिक लोकप्रतिनिधीकडून मिळत आहे. नालेसफाई करूनही पुन्हा नाल्यात कचरा पडल असल्याने नाले सफाई करून फायदा होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. नाले सफाई करतांना दरोरोज सुमारे २० ट्रक कचरा निघत असून असे काम गेले अनेक दिवस सुरु आहे.परंतु असे असले तरी औद्योगिक विभागात नाल्यांची सफाई होताना अनेक अडचणी येत आहेत. नाल्यांमधून मोठ्या केबलचे जाळे आहे. शिवाय नाल्यांवर टाकण्यात आलेले पुल नाल्यातील कचऱ्याला अडवणूक ठरत आहेत. काही मोठ्या नाल्यात मोठ दगड असून ते माणसे काढू शकत नाहीत आणि नाल्यातून कचरा काढण्यास जेसीपी तसेच पोखलणचा वापर करता येत नाही. नाल्यात केमिकल मिश्रित पाणी असल्याने मजूर लावून कचरा काढता येत नाही अशी मोठी समस्या आहे. मुळात एमआयडीसीच्या सद्य परिस्थितीमुळे काम करणे अवघड होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी करीत आहेत. याबाबत एमआयडीडी अधिकारी दीपक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, नालेसफाई हे काम पालिका करीत असून आमचा काही संबध नाही. आम्ही याच परीस्थितीत पूर्वी नाले सफाई करीत होतो. मोठ्या केबल्स आणि पूल हे पूर्वीपासून तसेच असल्याने यावर काहीच बोलू शकत नाही. परंतु नालेसफाई करतांना हँड्ग्लोज आणि गमबूट वापरून नालेसफाई केली पाहिजे अशी पुष्टी जोडली.