सांगली दि. 1 (जि.मा.का.) : कवठेमहांकाळ शहरातील नागरिकांनी घेतलेला जनता कर्फ्युचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. हा निर्णय स्वयंस्फूर्तीने प्रत्येक तालुका स्तरावर स्थानिक प्रशासनाने घ्यावा, तरच कोरोनाची साखळी तोडण्यात आपण यशस्वी होऊ. जनता कर्फ्यु लावताना शेतकऱ्याच्या मालाला यातून सूट मिळावी तसेच भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू घरोघरी मिळतील याबाबतचे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
कवठेमहांकाळ येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद शिक्षण सभापती छायाताई पाटील, पंचायत समिती सभापती विकास हाक्के, प्रांताधिकारी समीर शिंगटे, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, तहसीलदार बी. जे. गोरे, प्र. गटविकास अधिकारी अशोक बांगर, अनिता सगरे आदि उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाला रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा वाढविण्यावर भर देण्यात यावा. आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटर, रेमिडेसिवीर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सज्ज ठेवावी. रुग्णांची संख्या जास्त असलेल्या भागात कंटेनमेंट झोन जाहीर करून कडक निर्बंध पाळले जातील याची खबरदारी घ्यावी. कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथील कोविड रूग्णालय तातडीने सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. सांगली जिल्ह्यात 45 वर्षांवरील नागरिकांचे सुमारे ४७ टक्के लसीकरण पूर्ण झालेले आहे. लसींचा पुरवठा वाढल्यावर लसीकरण केंद्रे, तसेच मनुष्यबळ वाढविण्याचे नियोजन करण्यात यावे. हायवेच्या कार्यासाठी आलेल्या परप्रांतीय कर्मचाऱ्यांची सुद्धा आरोग्य तपासणी करावी, असे आदेश यावेळी त्यांनी दिले.
कोरोना रूग्ण जास्त असणाऱ्या गावांमध्ये कंटेनमेंट झोनची कार्यवाही अत्यंत कडकपणे राबविण्यात यावी, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, होम आयसोलेशन असलेल्या व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत. गावातील कोरोना बाधितांची यादी गावातील दर्शनी भागात लावण्यात यावी. यामुळे गावात कोरोना बाधित असलेल्या रूग्णांवर आपोआपच बंधने येतील. शासनाकडून लसीचा पुरवठा ज्या प्रमाणात येईल त्या प्रमाणात लसीकरण केंद्रे वाढविण्याची कार्यवाही करण्यात यावी. लसीकरणासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ देण्याबाबतचे नियोजन तसेच लसीकरणासाठी गर्दी होवू नये यासाठी लसी प्राप्त झालेल्या प्रमाणातच लस घेणाऱ्यांना निमंत्रण देवून लसीकरण केंद्रात लस द्यावी. यामुळे अनावश्यक गर्दी होणार नाही, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.