डोंबिवली, (प्रशांत जोशी) : उत्तर भारतीयांचा श्रावणमास सोमवारपासून सुरु झाला. या निमित्ताने ओमशिवसाई विश्वकर्मा सेवा संस्थेतफे सागावेश्वर महादेव मंदिर येथुन सुरू झालेल्या भव्य कावडिया यात्रेचा शुभारंभ बम बम भोलेच्या गजरात झाला.
यात्रेचा शुभारंभ माजी खासदार संजीव नाईक यांनी केला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस नंदू परब, भाजप नगरसेविका डॉ. सुनिता पाटील, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधि संतोष केणे, शिवसेनेचे मुकेश पाटील, करण जाधव, युवा नेते राहुल केणे, आयोजक व संस्थेचे अध्यक्ष रामजी विश्वकर्मा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सोमवारच्या पूर्व संध्येला श्री शंकराचा अभिषेक दुधाने केल्यानंतर सोमवारी सकाली सागाव येथील महादेव मंदिरात भगवान शंकराचरणी पूजन करुन जलशुद्धीकरण करण्यात आले. हे शुध्दीकरण केलेले पवित्र जल सर्व शिवभक्त कावडियांनी आपआपल्या पात्रात जमा केले. यथासांग पूजा झाल्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शंकराला पुष्पांजलि अर्पण केल्यावर बम बम भोलेच्या गजरात कावडिया यात्रेचा शुभारंभ झाला. भगवान शंकराच्या तसबिरींच्या रथासमोर पाहुण्यांच्या हस्ते नारळ वाढवून कावडीयांची यात्रा सुरु झाली.
यात्रेत सुमारे साडेतीन ते चार हजार कावडिया सहभागी होते. बोरीवली, वसई, नालासोपारा, सायन, उल्हासनगर, इत्यादी ठिकाणाहून येथे कावडिया येत असतात. मंदीरापासून निघणारी यात्रा मानपाडा रस्ता, शिवाजी उद्योगनगरपासून चार रस्ता, टिळक चौक, गणपती मंदिर, नेहरू मैदान, मंजुनाथ शाळा, घरडा सर्कल, सूचक नाका, चक्की नाका, विठ्ठल वाडी, श्री राम टॉकिज, नेताजी चौक मार्गे शेवटी अंबरनाथ शिवमंदिर येथे यात्रेचा समारोप होतो. अंबरनाथ येथील शिवमंदिरात जलाभिषेक झाल्यानंतर यात्रेत सहभागी झालेल्या सर्व शिवभक्तांना महाप्रसाद देण्यात येतो.