रत्नागिरी : कासव संरक्षण व संवर्धन योजनेंतर्गत वन विभागाने राजापूर तालुक्यातील माडबन येथे आँलिव्ह रिडले जातीच्या कासवांची तब्बल 80 पिल्लं समुद्रात सोडली. गेल्या काही वर्षापासून कोकणात आँलिव्ह रिडले या जातीच्या कासवांचे संवर्धन व संरक्षण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. दरम्यान तीन वर्षांपासून कासवांची अंडी संवर्धन करण्याचा उपक्रम स्थानिकांच्या मदतीने माडबन व वेत्ये येथे राबविला जात आहे. यावर्षी या दोन्ही समुद्रकिनारी 14 कासवांची घरटी संरक्षित करण्यात आली होती. वेत्ये येथे 492 व माडबन येथे 1695 कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली होती. यापुर्वी व्येत्ये येथून 141 आणि माडबन येथून 506 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले होते. त्यानंतर आता 80 पिल्ल समुद्रात सोडण्यात आली आहेत. यावेळी वनविभागाचे वनक्षेत्रपाल बी आर पाटील, राजापूरच्या वनपाल राजश्री कीर, वनरक्षक संजय रणधीर यांच्यासह माडबनच्या सरपंच सायली खडपे, पोलीस पाटील श्याम गवाणकर, नाटेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.