रत्नागिरी : रत्नागिरीतल्या गावखडी समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाची सुमारे 35 पिल्ले समुद्रात झेपावली आहेत. निसर्गयात्री संस्थेचे कार्यकर्ते प्रदीप डिंगणकर, सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, वन विभाग, गावखडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे कासव बचाव मोहीम यशस्वी होत आहे. मंडणगड तालुक्यातील वेळास येथे अनेक वर्षे कासव महोत्सव साजरा होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील असा दुसरा महोत्सव गावखडी येथे भरवण्याचा मानस निसर्गयात्री संस्थेचा आहे. कारण गावखडी समुद्रकिनारी सुद्धा कासव संवर्धन मोहीम सुरू आहे. गावखडी समुद्रकिनारी नोव्हेंबर 2017 पासून कासव अंडी घालायला येत आहेत. सुरक्षा रक्षक राकेश पाटील व प्रदीप डिंगणकर यांनी नियमित गस्त घालून, जिथे कासवांनी अंडी घातली आहेत तिथून ती वन विभागाच्या मदतीने कृत्रिम हॅचरीमध्ये ठेवली. 50-55 दिवसांत अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. ही पिल्ले समुद्रात सोडली जातात. निसर्गयात्रीचे संस्थापक सुधीर रिसबूड म्हणाले, आम्ही चार-पाच वर्ष या किनार्यावर लक्ष ठेवून होतो. कासव भरपूर येतात पण अंडी मिळत नाहीत. माणसांपासून मोठा धोका निर्माण झाला. परंतु डिंगणकर व पाटील यांनी अहोरात्र मेहनत घेऊन सर्व ट्रॅक शोधून गतवर्षी 835 पिल्ले समुद्रात झेपावली. शेवटचे पिल्लू समुद्रात झेपावेपर्यंत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. यंदा 9 घरटी झाली असून त्यातील 150 पिल्ले समुद्रात झेपावली आहेत. खरं तर कासवांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. त्याला पर्यटनाची जोड मिळाली तर उपयोग होईल. त्यातून रोजगारसंधीही उपलब्ध होती.