
रत्नागिरी : कर्नाटकात भाजपला मिळालेल्या भरघोस यशाचा जल्लोष कोकणात सुद्धा पहायला मिळाला. रत्नागिरी जिल्हा भाजप कार्यालयाच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. आणि कर्नाटक राज्यात मिळवलेल्या यशाबद्दल विजयाचा जल्लोष करण्यात आला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून पेढे वाटून यावेळी जल्लोष साजरा करण्यात आला.कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे आता २१ राज्यांत भाजप सत्तेत आली आहे. भाजपच्या या विजयाचा जल्लोष संपूर्ण देशभर सुरु आहे.रत्नागिरीतहि हा जल्लोष पहायला मिळाला. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर यांच्यासह रत्नागिरी जिल्हा भाजपचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला, त्यामुळे कोकणात साजरा झालेल्या या जल्लोषाला सुद्धा विशेष राजकीय महत्व प्राप्त झालं आहे.