रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): सरकारी काम, बारा महिने थांब याची प्रचिती सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना येवू लागली आहे. लांजा नगरपंचायतीमधील सुमारे १८ कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला आहे. सेवा निवृत्त होण्याचा कार्यकाळ जवळ आला तरी अद्याप कायम सेवेत घेतलेले नसल्याने कर्मचारी न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
लांजा नगरपंतायतीमधून सेवा निवृत्त झालेले वसंत रामबाणे यांची तब्बल २९ वर्ष सेवा झाली. २८ डिसेंबर २०१२ मध्ये लांजा नगरपंचायत अस्तित्वात आली. त्याआगोदर लांजा ग्रामपंचायतीमध्ये हे कामगार कामाला होते. वसंत रामबाणे यांच्याप्रमाणे लांजा नगरपंचायतीमधील १८ कर्मचारी आपण लांजा नगरपंचायतीमध्ये कायम होवू याची वाट पहात आहेत. लांजा नगरपंचायतीसोबत देवरूख आणि गुहागर नगरपंचायत स्थापन करण्यात आली होती. या दोन नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समावून घेण्यात आले होते. मात्र हा न्याय लांजा नगरपंचायतीमधल्या कर्मचाऱ्यांना लागू झालेला नाही. एका नगरपंचायतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक न्याय तर दुसऱ्या नगर पंचायतीमध्ये कर्मचाऱ्याला वेगळा न्याय, त्यामुळे एवढी वर्ष सेवा करूनही आमच्या वाट्याला असं का असा सवाल कर्मचारी करत आहेत. देवरूख आणि गुहागर नगरपंचायतीबरोबरही लांजा नगरपंचायत अस्तित्वात आली. मात्र आकृतीबंद चुकीचा सादर केल्यानं लांजा नगरपंचायतीमधील ३७ पैकी १९ जणांना सेवेत कायम केलं गेलं. मात्र या १८ लोकांना डावललं गेलं. दरम्यान लांजा नगरपंचायत सुद्धा या १८ कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभी असून हे कर्मचारी सेवेत कसे येतील याचा पाठपुरावा करत असल्याचं लांजा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष राजू कुरुप यांनी सांगितले.