पणजी, 23 जानेवारी : “हा चित्रपट शहरातील शेवटच्या संयुक्त कुटुंबांविषयी आहे. या कुटुंबातील विविध सदस्य आणि त्यांचे परस्परांशी असलेले गुंतागुंतीचे नातेसंबंध या कुटुंबाच्या एक एकत्रित प्रवासात उलगडत जातात” अशा शब्दांत दिग्दर्शक मंगेश जोशी यांनी आपल्या ‘कारखानीसांची वारी’ या चित्रपटाचे वर्णन केले. गोव्यात सुरु असलेल्या 51 व्या इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमा फिचर फिल्म विभागात त्यांचा हा चित्रपट दाखवला जाणार आहे. या चित्रपटाची माहिती त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या चित्रपटात भूमिका केलेल्या अभिनेत्री गीतांजली कुळकर्णी यांनी याविषयी सांगितले की, ‘कारखानीसांची वारी’ मध्यमवर्गीय कुटुंबातल्या लोकांचे आयुष्य आणि नातेसंबंधांतील गुंतागुंत तिरकसपणे सांगतो.
पुण्यातल्या कारखानीसांच्या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीचा-आजोबांचा मृत्यू होतो आणि मग त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांची अपत्ये आणि इतर भावंडे त्यांचे अस्थीविसर्जन करण्यासाठी निघतात. त्यांचा हा विलक्षण प्रवास सुरु होतो, आणि थोड्याच वेळात, एका मुलाची गरोदर असलेली प्रेयसी रॉयल एन्फिल्ड वर यांच्यापाठोपाठ येते आणि त्या मुलाला लग्न करण्यासाठी समजावत असते. हा गोंधळ सुरु असतो, त्याच वेळी दुसरीकडे, घरातील आजोबांच्या पत्नी, आपल्या दिवंगत नवऱ्याच्या संपत्तीचा ताबा घेण्यासाठी पुण्याहून देहू ला मुक्कामाला जातात. आणि तिथे इतकी वर्षे लपवले गेलेले एक ‘स्फोटक’ गुपित त्यांच्यासमोर उघड होते.
विनोदी अंगाने, हलक्याफुलक्या स्वरूपात सांगण्यात आलेली ही कथा प्रेक्षकांना चिमटे घेता घेताच अंतर्मुख करते. केवळ व्यक्ती म्हणूनच नव्हे तर समाज म्हणूनही अनेक गोष्टींचा विचार करण्यास भाग पाडते, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश जोशी स्वतःही पुण्यातले आहेत. “मी पुण्यात जी माणसे पहिली त्यांच्यावरूनच प्रेरणा घेत यातल्या व्यक्तिरेखा बांधल्या आहेत. एका कुटुंबात झालेल्या मृत्यूनंतर आलेल्या वैयक्तिक अनुभवांवरच ही कथा गुंफली असल्याचे त्यांनी सांगितले.
जोशी यांनी 2011 साली आपला पहिला चित्रपट ‘ही’ दिग्दर्शित केला होता. त्यानंतर 2016 साली त्यांनी लिहिलेल्या दिग्दर्शित आणि निर्मित ‘लेथ जोशी’ चित्रपटाने 15 पुरस्कार जिंकले होते.