कोझिकोड : दूध उत्पादकांच्या संघटनेचे देशव्यापी समन्वयन करण्यासाठी केरळ येथील कोझिकोड शहरामध्ये दूध उत्पादकांच्या संघटनांचे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 14 व 15 मे 2022 रोजी संपन्न होत असलेल्या या कार्यशाळेसाठी देशभरातील 21 राज्यांमधून प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी कार्यशाळेचे उदघाटन केले. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेमध्ये डॉ. सुधीर बाबु, विजयांबा आर., डॉ. दिनेश अब्रोल, डॉ. विजू कृष्णन, डॉ. अजित नवले, प्रो. व्यंकटेश अत्रेय व पी. कृष्णप्रसाद संबंधित विषयांची मांडणी करणार आहेत.
दूध उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये सहकारी क्षेत्राचे महत्त्व, कॉर्पोरेट कंपन्यांनी दूध क्षेत्रात उभी केलेली आव्हाने, दूध उत्पादकांच्या लुटमारी विरोधात सुरू असलेले देशव्यापी संघर्ष व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यामध्ये दुग्ध व्यवसाय कशाप्रकारे आपली भूमिका पार पाडू शकतो आदी विषयांवर या कार्यशाळेमध्ये विचारमंथन होणार आहे. दुधाला एफ.आर.पी. चे कायदेशीर संरक्षण मिळावे, दुग्ध पदार्थांच्या निर्मितीमध्ये निर्माण होणाऱ्या उत्पन्नात शेतकऱ्यांना वाटा मिळावा, दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर निर्बंध घालावेत व निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, दुधाचा उत्पादन खर्च कमी करावा, दूध भेसळीवर लगाम लावावा यासारख्या विविध मागण्यांसंदर्भात देशस्तरावर संघर्ष व एकजूट मजबूत करण्यासाठी या कार्यशाळेचा नक्कीच उपयोग होईल.
महाराष्ट्रामधून डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, डॉ. शिवानंद झळके, सुदेश इंगळे, संजय जाधव या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रात दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी विविध संघटनांना एकत्र करत स्थापन झालेल्या व गेली सहा वर्ष दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी संघर्ष करत असलेल्या दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनांचे अनुभव यावेळी महाराष्ट्राच्या वतीने कार्यशाळेमध्ये मांडण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील दूध उत्पादकांच्या विशिष्ट मागण्याही या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाच्या वतीने ठेवण्यात येतील.