
डोंबिवली : महिलांनी आपल्या प्रगतीसाठी काही संकल्प केले पाहिजेत. केवळ इतरांना दोष देत बसू नये. स्वत:च्या कर्तृत्वाला गगनापर्यंत नेण्याचे ध्येय डोळ्य़ासमोर ठेवले पाहिजे. स्त्रियांमध्ये एकजूट हवी आहे. स्त्रियांना केवळ देवळांत प्रवेश हवा या गोष्टीसाठी स्त्रियांनी आपली शक्ती खर्ची न करता स्त्रियांच्या संरक्षणासाठी वापरा असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका शुभदा खटावकर यांनी डोंबिवलीत केले.
आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था, डोंबिवली, गावदेवी विद्यामंदीर आणि जायन्ट्स ग्रुप ऑफ कल्याण यांच्यातर्फे जागतिक महिला दिना कार्यक्रमात खटावकर प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कांचनगौरी महिला पतपेढी संचालिका उर्मिला प्रभुघाटे, कल्याण-डोंबिवली महापालिका नगरसेविका ज्योती मराठे, जायट्न्स वुमन डे स्पेशल चेअरमन डिंपल डोईफोडे, जायन्ट्स वेल्फेअर फाऊंडेशनचे अशोक मेहता, जायन्ट्स ग्रुप ऑफ कल्याणचे अध्यक्ष हेमंत नेहते, गावदेवी विद्यामंदीरच्या मुख्याध्यापिका स्मिता सूर्यवंशी, विमल पाटील, जयश्री गाळणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खटावकर पुढे म्हणाल्या, महिला दिन हा केवळ एक दिवसासाठी साजरा करावा आणि वर्षभर विसरून जावे असा होता कामा नये. आजही अनेक ठिकाणी अत्याचार घडत असतात. स्त्रियांनी आपली शक्ती आता पणाला लावली पाहिजे. दृष्टवृत्तीला नष्ट करण्यासाठी स्त्रियांचे आणि मुलींचे धैर्य वाढवले पाहिजे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लेक लाडकी अभियान अंतर्गत फक्त कन्यारत्न असलेल्या महिला पालकांचा त्यांच्या पाल्यासह ‘‘कन्यारत्न पुरस्कार’’ देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात 48 महिला पालकांचा व शाळेतील 11 शिक्षकांचा कन्यारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. सतत अकरा वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमामध्ये 5 हजारहून अधिक महिलांचा कन्यारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. यावेळी हेमंत नेहते म्हणाले, स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहे. तिच्यामध्ये अफाट शक्ती, उर्जा, क्षमता आहे. स्त्रीला परमेश्वरने सोशिकतेचे, सहनशीलतेचे वरदान दिले आहे. ती स्वत: बरोबर इतरांचे जीवनही समृध्द करीत असते. अशा स्त्रीशक्तीचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण वसईकर यांनी केले तर पांडुरंग होले यांनी आभार मानले.
















