मुंबई । विक्रोळीतील एका राखीव भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव 20 वर्षांपासून होत आहे. म्हाडाच्या असणाऱ्या या भूखंडावर कोणत्याही प्रकारचे काम झालेलं नाही. झाडे-झुडपे उगवली आहेत. जलतरण तलाव व्हावा, यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.
हा मुद्दा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही विरोधक लावून धरण्याची शक्यता आहे. जलतरण तलाव झालाच पाहिजे. आम्ही संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करणार आहोत. तसेच ठिय्या आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 118 चे वॉर्ड अध्यक्ष जयंत दांडेकर यांनी दिला आहे. दांडेकर यांनी मंगळवारी भूखंडाची पाहणी केली.
दरम्यान, या जलतरण तलावासाठी आरक्षित भूखंडावर 20 वर्षांपूर्वी उद्घाटन झाले होते. यानंतर पुन्हा 31 ऑगस्ट 2014 ला विधानसभेच्या निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यावेळचे कामगार राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांच्या हस्ते जलतरण तलावाच्या कार्याचा शुभारंभ झाला. तो केवळ नावापुरताच ठरला.
‘जलतरण तलाव व्हावा, अशी मनसेची तीव्र इच्छा आहे. तरण तलाव झाल्यास स्थानिकांना जलतरण करता येईल, मुलुंड येथे जावे लागणार नाही,” असे दांडेकर म्हणाले.