
पाहण्यासाठी भाविकांची उसळली गर्दी
मुंबई (प्रतिनिधी) : विक्रोळीतील कन्नमवार नगरात कोल्हारच्या कोल्हाळेश्वराचे मंदिर हुबेहूब साकारण्यात आले आहे. साईनाथ मित्र मंडळाने उभारलेल्या प्रतिकृतीला पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळत आहे. सात दिवस या ठिकाणी गणेशोत्सव साजरा होणार आहे.

देशाचा अमृत महोत्सव आणि साईनाथ मित्र मंडळाने आपल्या “विक्रोळीचा विघ्नहर्ता गणेशोत्सव” मंडळाचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना मुंबईतील विक्रोळी(पूर्व) उपनगरातील कन्नमवार नगर येथे नगर जिल्ह्यातील कोल्हार येथील कोल्हाळेश्वरांच्या पुरातन मंदिराची प्रतिकृती उभारुन मुंबईकरांना साक्षात कोल्हाळेश्वरांचे दर्शन घडविले आहे.

अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येत्या २६ जानेवारीला दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्राच्या वतीने या पुरातन मंदिराचा देखावा साकारण्याची संधी मिळावी, असा मानस मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक राहुल वाघधरे, अध्यक्ष प्रकाश मिसाळ, कार्याध्यक्ष विजय मोरे, सचिव रामनाथन मुथलीयार , व खजिनदार चंदन कदम या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्याच उद्देशाने जाणीवपूर्वक यंदा देखाव्यासाठी या मंदिराची निवड केल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

विक्रोळीतील साईनाथ मित्र मंडळाने गत पन्नास वर्षांतील वाटचालीत सातत्याने राष्ट्रीय,सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. विविध स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास घडविला. मंडळाला सलग तीन वर्षे उत्कृष्ट मूर्ती आणि सलग दोन वर्षे शिस्तप्रिय मंडळ म्हणून पोलीस खात्याच्या पुरस्कार मिळाला आहे.
ख्यातनाम सेलिब्रिटींचे दर्शनासाठी आवाहन
मुंबईकर भाविक भक्तांनी विक्रोळीत साकारलेल्या या पुरातन मंदिराला भेट देऊन जागृत कोल्हाळेश्र्वरांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक- अभिनेता महेश मांजरेकर , अभिनेता सयाजी शिंदे, अभिनेता मंगेश देसाई,अभिनेता पुष्कर श्रोत्री, मयुरेश पेम, विवेक सांगळे,लेखक- गीतकार – अभिनेता प्रकाश राणे व अभिनेत्री आसावरी जोशी,पिंकीचा विजय असो मालिकेतील लाडकी पिंकी अभिनेत्री शरयू सोनवणे आदींनी इलेक्ट्रॉनिक तसेच समाज माध्यमांद्वारे केले आहे.
मंदिर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोल्हारचा कोल्हाळेश्वर
कोल्हार हे ठिकाण नगर – मनमाड राज्य महामार्गावर राहाता तालुक्यात प्रवरा नदीच्या कुशित वसलेले असुन शिर्डी पासुन दक्षिणेला पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. तेथुन शनी शिंगणापूर साधारणपणे अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. असे हे ठिकाण शिर्डी – शिंगणापूर रस्त्यावर आहे.
श्री. कोल्हाळेश्वर हे भगवान महादेवांचा अवतार असुन प्रवरामाईच्या अमृतधारेत कोल्हार येथे प्रवरा नदीकाठी हे पुरातन मंदिर आहे. समुद्र मंथनातून निघालेल्या अमृत आणि विष यांच्या वाटपावरून देव आणि दैत्य यांच्यातील भांडणाच्या प्रसंगी या ठिकाणी राक्षसांनी भयंकर कोलाहल (आरडाओरड)माजविले होते. त्यामुळे सारेजण भयभीत अन त्रस्त झाले होते. यावेळी साक्षात भगवान शंकरांनी येथे माजलेल्या दैत्यांचा विनाश करण्यासाठी हलाहल विष प्राशन केले होते. त्यामुळे या ठिकाणाला कोल्हाळेश्वर असे नाव पडले. हे शिवलिंग मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम यांनी वनवास गमन प्रसंगी त्यांना पुजा करण्यासाठी स्थापन केल्याची अख्यायिका असुन ते रामेश्वर नावाने स्थापित आहे. कोल्हार भगवतीपुर मंदिर देवस्थान ट्रस्टने या मंदिराचा जीर्णोध्दार करुन भव्यदिव्य आणि लक्षवेधी मंदिर उभारले आहे.















