मुंबई : इमारत क्रमांक 240 समोरील जागा वाहन तळासाठी द्या, अशा मागणीचे वृत्त दिवसांपूर्वी एक दोन वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते आणि त्यात विक्रोळीकर वाहन तळाची मागणी करत आहेत, असे लिहिण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सदर मागणीला जनता दल सेक्युलर विक्रोळी तालुका, विक्रोळीकर एज्युकेशनल फोरम आणि भाजपचे प्रथमेश राणे यांनी विरोध केला आहे. यासंबंधी लवकरच मुंबई महापालिकेच्या विभागाशी पत्रव्यवहार करू आणि विक्रोळीकर म्हणून आमची मागणी जर त्या ठिकाणी शैक्षणिक संस्था निर्माण होत असेल तर त्या बाजूने असेल, असे सांगण्यात आले आहे.
नवी मुंबईची ओळख शैक्षणिक हब म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी विविध विद्यापीठे, शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील पूर्व उपनगर असलेल्या विक्रोळी कन्नमवार नगर येथे शैक्षणिक हब निर्माण झाल्यास कोणाचा विरोध असेल का?असा प्रश्न विक्रोळीकर एज्युकेशन फोरमचे अध्यक्ष आणि भाजपचे माजी प्रभाग अध्यक्ष प्रथमेश राणे तसेच जनता दलाचे विक्रोळी तालुका अध्यक्ष यतीन तोंडवळकर, मुंबई महासचिव ऍड. प्रशांत गायकवाड, तालुका सचिव प्रफुल रणदिवे, प्रभाग अध्यक्ष भूषण भिसे, विवेक कांबळे, नितीन आडकर आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
विक्रोळीकर एज्युकेशनल फोरमचे प्रथमेश राणे आणि जनता दल यांनी संयुक्तरित्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मध्यंतरी एक दोन वृत्तपत्रात इमारत क्रमांक 240 समोरील जागा वाहन तळासाठी द्या, अशी मागणी विक्रोळीकर नागरिकांनी केली आहे, अशी एकांगी बातमी प्रसिद्ध झाली होती. सदर बातमी बघता सदर जागा खाजगी शैक्षणिक संस्थेसाठी देण्याचा प्रस्ताव आहे, असे त्यात लिहिण्यात आले होते. परंतु त्या शैक्षणिक संस्थेचे नाव बातमीत नव्हते. त्या शैक्षणिक संस्थेचे जे कोणी अधिकृत प्रतिनिधी आहेत त्यांचाही खुलासा त्या बातमीत नव्हता. वस्तुतः बातमी लिहिताना विक्रोळीकर नागरिकांचा किती विरोध आहे ते तपासणे गरजेचे होते. जी यंत्रणा जागा उपलब्ध करणार आहे त्यांची प्रतिक्रिया हवी होती. यापैकी कशाचीही शहानिशा न करता वाहन तळासाठी जागा द्या अशी बातमी छापली गेली. आणि त्याला विक्रोळीकर नागरिकांचा विरोध अशी आवई उठवण्यात आली. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सदर जागेवर वाहनतळ ही मागणी आम्हाला अमान्य आहे. त्या ठिकाणी शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांच्या हितासाठी येत असेल, तर आनंदच आहे. सदर जागा शैक्षणिक संस्थेसाठी देण्यास विक्रोळीकर नागरिक म्हणून आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. आमच्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं आहे. आज कन्नमवार नगरातील दोन ते तीन पिढ्या येथे शिकल्या. येथील शिक्षणाच्या पायावरच आयटीआय, डिप्लोमा अभियांत्रिकी असे उच्च दर्जाचे शिक्षण इतर शैक्षणिक संस्थात त्यांना घेता आले. कला वाणिज्य पदवीधारक होता आले. आता याही पुढे दर्जेदार शिक्षण उपलब्ध आहे. काळाशी सुसंगत शिक्षण येणाऱ्या काळात आपल्या विभागातील मुलांना मिळण्यासाठी शैक्षणिक संस्थेची आवश्यकता आहे.
कन्नमवार नगरची लोकसंख्या येत्या काळात चौपटीने वाढेल. आपल्या इकडचे अनेक शालेय विद्यार्थी वसाहती बाहेर शिकायला जात आहेत. आपल्या पिढ्या येथील शैक्षणिक संस्थांमध्ये शिकले आणि सवरले आहेत. हे पाहता शालेय स्तरावर उत्तम शिक्षण मिळण्यासाठी आणि महाविद्यालय स्तरावर आधुनिक शिक्षण घेणसाठी शैक्षणिक संस्थेची गरज आहेच.
माहिती घेतल्यास शालेय स्तरापासून ते पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिक्षण आपल्या कन्नमवार नगरात उपलब्ध आहे. हे आपल्या प्रत्येकासाठी भूषणावह आहे. एखाद्या विद्यापीठा सारखे कोर्सेस येथे सुरू आहेत. त्यामुळे आम्ही शिक्षणप्रेमी सदर जागा शैक्षणिक संस्थेसाठी उपलब्ध व्हावी अशी आग्रही मागणी करतो. शिक्षणप्रेमी आणि शांततावादी नागरिकांनी त्यास पाठिंबा द्यावा ही विनंती, असे म्हटले आहे.