मुंबई : विक्रोळी कन्नमवार नगर येथील मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांना सामाजिक न्याय विभागाने दिलासा द्यावा जेणेकरून त्यांचा पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागेल अशी मागणी शिवसेना विक्रोळी विधानसभा संघटक(मागासवर्गीय विभाग) हेमंत पवार यांनी सामाजिक न्याय विभागाकडे केली आहे. याबाबत आम्ही लवकरच पत्र व्यवहार करू असे हेमंत पवार यांनी सांगितले.
कन्नमवार नगरात 38 पेक्षा जास्त मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था असून सुमारे दीड हजार कुटुंब राहतात. सामाजिक विभागाच्या जाचक अटींमुळे या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. अनेक इमारती जीर्ण झाल्या असून केव्हाही दुर्घटना घडू शकते. म्हणूनच या प्रश्नाबाबत आम्ही पाठपुरावा सुरू करणार आहे. हा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न करू, असे हेमंत पवार म्हणाले.
या ठिकाणी अनेक इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. मात्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घातलेल्या अटी आणि शर्ती यामुळे मागासवर्ग गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पुनर्विकासात अडथळा निर्माण झाला आहे, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.