मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील जर्जर झालेल्या जुन्या इमारतींचा प्रश्न घाटकोपर येथील बिल्डींग कोसळल्यानंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे. म्हाडाची नियोजनबद्ध वसाहत असलेल्या कन्नमवार नगरातही अनेक इमारती कधीही कोसळतील, अशी परिस्थिती आहे. येथील अनेक जुन्या इमारती टेकुच्या सहाय्याने उभ्या आहेत. त्यामुळे जीव मुठीत घेऊन रहिवासी येथे वास्तव्य करत आहेत. इमारत क्रमांक १८० पासून १९० पर्यंत ते इमारत क्रमांक ६७, ६८, १३०, १३१, ८३, ८४, १०३, १०४, १०६, १११, ११२ अशा जर्जर आणि काही धोकादायक इमारती येथे आहेत.
याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री संक्रमण शिबिरातील इमारत क्रमांक १८०, १८१ , १८३ मधील रहिवाशांनी सभा घेत म्हाडाने आमचे पुनवर्सन विक्रोळीतच करावे अशी मागणी केली. यावेळी म्हाडाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. “संक्रमण शिबिरातील सर्वच इमारतीची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे म्हाडाने आमचे कन्नमवार नगरातच अन्य ठिकाणी स्थलांतर करावे,” अशीही मागणी रहिवाशांनी केली आहे.
दरम्यान, घरांमध्ये सिलिंग पडण्याच्या दुर्घटना घडत आहेत. काही दिवसापूर्वी १८१ क्रमांकाच्या इमारतीत राजीव रेडीज यांच्या घरी मध्यरात्री सिंलींग कोसळले. यामध्ये त्यांची पत्नी मुलगी यांना गंभीर दुखापत झाली. रहिवाशी जीव धोक्यात घालून घरात राहत आहेत.
संक्रमण शिबिरातील रहिवाशांना गोराईतील संक्रमण शिबीरात जा, असे म्हाडाकडून सांगण्यात येत आहे, आम्ही तिथे कसे जाणार? आमच्या मुलांची शाळा सुरू झाली आहे. गेल्या ४० वर्षांपासून येथे राहतो. १९९० नंतर एकदाही या इमारतीचे दुरुस्ती झालेली नाही असा आरोप रहिवाशांनी केला आहे.
म्हाडातर्फे तात्पुरत्या स्वरुपातील संक्रमण शिबीर कन्नमवार नगरात उभारले जात आहे. काही दिवसात या शिबिरातील इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल. पण यातून फक्त ९२ गाळे उपलब्ध होतील. यासाठी काही कोटींमध्ये खर्च आला आहे. हाच खर्च इमारतीच्या दुरुस्तीसाठी वापरून इमारतीचे आयुष्य वाढवता आले असते, असे रहिवासी श्रीनिवास तल्ला यांनी सांगितले.
“म्हाडाकडे अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करत आहे. १८० ते १९० या दहा इमारतींच्या दुरुस्तीसाठी १२ कोटींच्या निधीची तरतूद आवश्यक होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होऊ शकत नाही, असे म्हाडाकडून सांगण्यात आले होते. १२०० कुटूंब इथे भीतीच्या छायेत राहत आहेत. वॉटर प्रूफिंगसाठी म्हाडाकडे १ कोटी निधीची मागणी करण्यात आली होती. तेही अजून दिलेले नाहीत. म्हाडा प्रशासन आणि अधिकारी दुर्लक्ष करत आहे. घाटकोपरच्या घटनेसारखी घटना कन्नमवार नगर मध्ये घडली तर त्याला म्हडा प्रशासन जबाबदार राहील. प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे, प्रश्न न सुटल्यास पावसाळी अधिवेशनात पायर्यांवर बसून धरणे आंदोलन करू ” – सुनील राऊत आमदार
प्रतिक्रिया
इमारतीच्या दूरवस्थेमुळे कधी काय होईल, याची चिंता असते. म्हाडाने आमचे पुनवर्सन लवकर करावे, परंतु, कन्नमवार नगर सोडून कुठेही जाणार नाही – प्रसाद साटम, संक्रमण शिबीरामधील रहिवासी