दर्शना गोवेकर-गायकवाड यांनी साकारला देखावा
विक्रोळी : मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मानवी जीवन बदलले आहे. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये माणूस इतका मग्न होतो की आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, याचे भान राहत नाही. म्हणूनच मोबाईलचा अतिरेक टाळण्यासाठी घरगुती गणेशोत्सवाच्या सजावटीतून विक्रोळीतील दर्शना गोवेकर- गायकवाड यांनी संदेशात्मक देखावा साकारला आहे. मोबाईलच्या अति वापरापासून लोकांची सुटका होऊ दे, सामाजिक भान असलेला समाज घडू दे, असे साकडे गणरायाला घालण्यात आले आहे.
देखावा तयार करण्यासाठी त्यांना पंधरा दिवसांचा कालावधी लागला. की पॅड चे मोबाईल असताना आणि स्मार्टफोन आल्यानंतर बदललेले मानवी जीवन यावर संदेश आणि देखावा साकारण्यात आला. सजावटीसाठी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर केला आहे. स्मार्टफोनमध्ये आपण कसे गुरफटून गेलो आहोत हे या सजावटीतून दाखवण्यात आले आहे.
दर्शना यांनी सांगितले की, “आजकाल सगळेच मोबाईलवर इतके व्यस्त असतात की कुटुंब, मित्र किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांचा विसर पडतो. मोबाईलच्या व्यसनामुळे आपले आरोग्यही बिघडत आहे. म्हणूनच मी या गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकांचे लक्ष याकडे वेधले आहे. ही सजावट तयार करण्यासाठी मला नताशा, निकिता पांगे, सिद्धेश शिंदे, अनिरुद्ध साळवे, जय चव्हाण, गणेश आंगणे यांनी मदत केली.
या निमित्ताने, दर्शना यांनी आवाहन केले आहे की, आपण सगळे मिळून मोबाईलच्या या व्यसनावर मात करण्याचा प्रयत्न करूया. आपण आपल्या जीवनात मोबाईलचा आवश्यकतेनुसार वापर करून आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो आणि आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवू शकतो.
सदर देखाव्यात आजी आजोबा आणि नातवंडे खेळताना दाखवण्यात आले आहेत. पूर्वीची जीवन पद्धती आणि आत्ताच जीवन याबाबत संदेश देण्यात आला आहे. जेवताना बसायला पूर्वी आणि आत्ता असणारा फरक यावर भाष्य करण्यात आले आहे.