मुंबई : विक्रोळी कन्नवार नगर येथील म्हाडाच्या एका इमारतीतील घराचे छत कोसळून सात वर्षाच्या मुलासह त्याचे वडिल गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली. कन्नमवार नगर- दोन येथील इमारत क्रमांक ७१ मधील खोली क्रमांक १९३१ मध्ये ही सकाळी आठच्या सुमारास दुर्घटना घडली. विनोद मोरे (३५ ) आणि आर्यन अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनेच्या काही मिनिटे आधी विनोद यांची पत्नी पुजा या सात महिन्यांची मुलगी स्वरा हिच्यासह निघून गेल्याने त्या बचावल्या.
विनोद त्यांची पत्नी पूजा, मुलगा आर्यन आणि सात महिन्याची मुलगी स्वरा घरात झोपलेले होते. त्यांची पत्नी उठून लहान मुलीला घेऊन स्वयंपाक घरात पाणी भरायला गेली. याच वेळी अचानक घराच्या छतासह सिलिंग पंखा विनोद आणि मुलाच्या अंगावर कोसळला. पंखा सुरू असल्याने त्याचे पाते आर्यनच्या हाताला लागून गंभीर दुखापत झाली तर विनोद यांच्या छातीवर सर्व छत आणि पंखा कोसळल्याने त्यांना ही जबरदस्त मार लागला आहे. मार इतका जबरदस्त होता की त्यांच्या घरात आणि इमारतीत सगळीकडे रक्त माखले होते.
म्हाडा इमारत पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर
आज ज्या इमातीत ही घटना घडली ती तीन माळ्यांची इमारत जर्जर झाली आहे. म्हाडाने १९६५ साली विक्रोळीत कन्नमवार नगर वसविले. अनेक इमारतींतील घरांमध्ये रोज अश्या प्रकारे छतांची पडझड होत आहे अनेक वर्षे म्हाडा इमारतींचा पुनर्विकास खोळंबला आहे.अनेक खोल्यामंध्ये छ्त कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु म्हाडाच्या या इमारतींच्या प्रश्नावर सरकारने अजून ही कोणता उपाय केला नसल्याने या पुढील काळातही अशा दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.