मुंबई, (कोकणवृत्तसेवा विशेष) : पूर्व उपनगरातील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडच्या सुनावणीदरम्यान आज उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले. येथील परिसरात होणार्या वायूप्रदूषणाबाबत केलेल्या उपाययोजनांबाबत पालिकेने अहवाल सादर केला. त्याची शहानिशा करण्यासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी, फिर्यादी यांनी भेट द्यावी, असे आदेश आजच्या सुनावणीत दिले आहेत, अशी माहिती फिर्यादींचे वकील अभिजीत राणे यांनी दिली.
क्षेपणभूमीवर व्यवस्थित फवारणी होत नाही, परिसरात मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत आहे, असे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यानुसार पालिकेकडून उपाययोजना केल्या जातात की नाही, याची पाहणी केली जाणार आहे. या आठवड्यात डम्पिंगवर भेट देण्याची शक्यता आहे.
वायू प्रदूषणामुळे मंडळाने महापालिकेला यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दुर्गंधी जावी, यासाठी आवश्यक असणार्या त्रुटी दूर कराव्यात अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा इशाराही पालिकेला देण्यात आला होता. त्यानुसार पालिकेने अहवाल सादर केला आहे. याच अहवालाची तपासणी करण्यासाठी पाहणी करा, असे आदेश न्यायालयाने दिले.
फिर्यादींमध्ये महापालिकेच्या विरोधात कन्नमवार नगर सोसायटी असोसिएशनकडून ऍड. अभिजीत राणे आणि ऍड. माधव जमादार यांनी बाजू माडली. वनशक्ती ही सामाजिक संस्थाही डम्पिंगविरुद्ध लढा देत आहे. मुख्य न्यायाधिश मंजुला चेल्लूर आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.