कांडला: जागतिक व्यापारात भारताला स्वत:चे स्थान निर्माण करायचे असेल, तर बंदर क्षेत्रात उत्तम व्यवस्था हवी, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गुजरातमधल्या कांडला पोर्ट ट्रस्ट इथे मोदी यांनी आज विविध प्रकल्पांचा शुभारंभ केला, यावेळी ते बोलत होते.
बंदर क्षेत्राच्या भरभराटीसाठी पायाभूत सुविधा आणि कार्यक्षमता यांची सांगड महत्वाची आहे, असे सांगून आशियातल्या उत्तम बंदरांपैकी एक म्हणून कांडला बंदर नावा रुपाला येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
इराणमधे भारताच्या सहभागाने चाबहार बंदर विकसित करण्यात येत असल्यामुळे कांडला बंदराच्या विकासाला आणखी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज पायाभरणी करण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कन्हेंशन सेंटर-विषयीही पंतप्रधानांनी माहिती दिली.
स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आपण राष्ट्रासाठी काय योगदान देऊ शकतो, याचा विचार करुन तसा निर्धार जनतेने करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर निर्मितीसाठी तसेच १४ आणि १५ व्या कार्गो बर्थच्या विकासासाठी पंतप्रधानांनी कोनशिला बसवली.
कच्छ सॉल्ट जंक्शनसाठी इंटर चेंज कम आरओबी निर्मितीसाठी तसेच दोन मोबाईल हार्बर क्रेन आणि कांडला बंदरात खते हाताळणाऱ्या यंत्रणांसाठी त्यांनी लेटर ऑफ ॲवॉर्ड अर्थात करारनामा बहाल केला.
सागरमाला प्रकल्प आणि बंदर केंद्रीत विकासाचा गुजरातवर सकारात्मक परिणाम झाला असून, त्यामुळे रोजगार निर्मितीलाही प्रोत्साहन मिळत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
गुजरातला लाभलेल्या समृद्ध सागरी परंपरेची माहिती, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दिली, आजही ही परंपरा सुरु असल्याचे ते म्हणाले. राष्ट्र पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे शताब्दी वर्ष साजरे करत असल्याचे सांगून कांडला बंदराचे दीनदयाळ पोर्ट ट्रस्ट कांडला असे नामकरण करावे, असे पंतप्रधानांनी सुचवले.