विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये प्रवेश करतेवेळी प्रसन्न वातावरण लाभते. आजूबाजूला असलेले असंख्य वृक्ष हे नगर पर्यावरणप्रेमी असल्याची साक्ष देते. राज्याचे माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी कामगारांच्या वसाहतीचे स्वप्न पाहिले आणि कन्नमवार नगर आकारास आले. विक्रोळी पूर्वेला असलेले कन्नमवार नगर ६०, ७० च्या दशकात वसले. आशिया खंडातील म्हाडाची आदर्श वसाहत असा तिचा नावलौकिक आहे. प्रत्येक इमारतीला स्वतंत्र नंबर, दोन इमारतींच्यामध्ये मोकळी जागा(दिवा-डोंबिवली येथे दाटीवाटीने असलेल्या इमारती पाहिल्यास ते लक्षात येईल), मराठी माणसे, आजूबाजूला हिरवीगार झाडेच झाडे, एका बाजूला खारफुटी, दुसऱ्या बाजूला पूर्व द्रुतगती महामार्ग, धर्मवीर संभाजी राजे मैदान(गोल ग्राउंड) हे कन्नमवार नगराचे वैशिष्ट्य आहे.
कला, क्रिडा, सांस्कृतिक
कन्नमवार नगर कला, क्रिडा, सांस्कृतीकतेने संपन्न आहे.
लोकशाहीर विठ्ठल उमप, संगितकार विठ्ठल शिंदे, साहित्यिक वामनराव होवाळ हे प्रसिद्ध व्यक्ती कन्नमवार नगरचे रहिवासी होते. उत्कर्ष व्याख्यानमाला पूर्वी प्रसिध्द होती. वामनराव होवाळ कथाकथन स्पर्धा येथे घेत. ज्येष्ठ नाटककार- लेखक प्रेमानंद गज्वी, नाट्यनिर्माते, अभिनेता, लेखक जनार्दन लवंगारे, साहित्यिक राजा ढाले
कन्नमवार नगरातच राहतात. प्रसिध्द अभिनेता संजय नार्वेकर येथेच वास्तवास होता. कन्नमवार नगरात दत्त क्रिडा प्रबोधिनीचा शालेय क्रिडा स्पर्धा लोकप्रिय होत्या. रांगोळी प्रदर्शन येथील खास खासियत होती. कामगार नाट्य मंडळाच्या स्पर्धा प्रसिद्ध आहेत.
इमारत क्रमांक 140 चे योगदान
70, 80 च्या दशकात येथील इमारत क्रमांक 140 चे कन्नमवार नगरच्या जडणघडणीत योगदान राहिलेलं आहे. नेरुरकर, तुकाराम पालकर गुरुजी, रा. पा. गुरव, शिवाजी कांबळे गुरुजी, शिवराम मळगावकर, मोहन पारकर, दत्ताराम मोडसिंग, एकनाथ सावळ यांनी कन्नमवार नगरसाठी कार्य केले. नेरुरकर, तुकाराम पालकर गुरुजी, रा. पा. गुरव यांना येथील मुलांसाठी व्यायामशाळा असावी, असे वाटत होते. पंरतु, बरेच प्रयत्न करूनही व्यायामशाळा आकाराला येत नव्हती. अखेर विकास हायस्कुलचे संस्थापक प. म. राऊत सर मदतीसाठी धावून आले आणि उत्कर्ष व्यायामशाळा बांधली गेली. यानंतर पालकर गुरुजी, गुरव यांनी येथील रहिवाशांना उत्तम विचार ऐकण्यास मिळावेत, यासाठी उत्कर्ष व्याख्यानमाला सुरू केली. तसेच कबड्डी स्पर्धाही सुरू केल्या. लहान मुलांच्या मनावर चांगले संस्कार व्हावेत, यासाठी कांबळे गुरुजींनी संस्कार केंद्र सुरू केले होते. या केंद्रात येणाऱयांवर उत्तम प्रकारचे संस्कार तेव्हा व्हायचे. शिवराम मळगावकर हे कन्नमवार नगरातील प्रसिद्ध नाव. जनता मार्केटची स्थापना त्यांनी केली. त्यांचे मळगावकर जनरल स्टोर्स प्रसिद्ध होते. 1970 च्या दरम्यान, मळगावकर हे तेव्हा अस्तित्वात नसलेल्या जनता मार्केटमध्ये व्यवसाय करायचे. तेव्हाही स्थानिक प्रशासनाचा विक्रेत्यांना त्रास होत असे. येथील विक्रेत्यांना कायमस्वरूपी दुकान मिळाले पाहिजे, या उद्देशाने त्यांनी पुढाकार घेतला आणि कन्नमवार नगरात जनता मार्केट अस्तित्वात आले. टागोर नगर येथील शनी मंदिर आणि कन्नमवार नगरातील हनुमान मंदिर उभारणीत त्यांचा महत्वाची भूमिका राहिलेली आहे. रांगोळीकार मोहन पारकर येथील रहिवासी होते. या नगरात उत्तम दर्जाची कलाकृती असावी, असे मोहन पारकर यांना वाटे, त्यातूनच ते रांगोळी प्रदर्शन भरवत आणि स्वतः त्यात सहभाग घेत. सोसायटीची (सहकारी संस्था गृह वस्तू भांडार) स्थापना करण्यामागे एकनाथ सावळ यांची महत्वाची भूमिका होती. रहिवाशांना अल्प दरात धान्य, तेल, डाळी आदी दररोजच्या वापरतील किराणा वस्तू मिळाव्यात हा या मागील उद्देश होता. मुंबईतील प्रसिद्ध आणि सहकार तत्वावरील अपना बाजार येथे सुरू व्हावे, असे दत्ताराम मोडसिंग यांना वाटे, त्यांच्या पुढाकाराने इमारत क्रमांक 72 येथे अपना बाजार सुरू झाले होते. याशिवाय 80 च्या दशकात बिंबार्क या कबड्डी संघातून खेळणारे सुनील पारकर आणि अशोक गायकवाड हे कन्नमवार नगरातील प्रसिद्ध खेळाडू या इमारतीचेच रहिवासी होते.
कन्नमवार नगरात मिळत असलेल्या सेवा :
महापालिकेचे क्रांतीज्योती महात्मा फुले, नव्याने झालेले अत्याधुनिक शुश्रूषा ही रुग्णालये येथे आहेत. कामगार कल्याण मंडळाची भव्य इमारत, राजर्षी शाहू आणि अस्मिता ही विधी महाविद्यालये, अस्मिता हे मुलींचे महाविद्यालय, विकास हायस्कूल शाळा समूह (यांचे रात्र महाविद्यालयही प्रसिद्ध आहे), अभय शिक्षण केंद्राचे आयसीएससी हायस्कूल, माध्यमिक शाळा, पालिकेची भव्य इमारत असलेली शाळा, उत्कर्ष विद्यालय,पोलीस स्टेशन, बेस्ट बस सेवा, हुतात्मा रविंद्र म्हात्रे मैदान, महानगर दंडाधिकारी न्यायालय या विभागात आहेत. उत्कर्ष व्यायामशाळा ही जुनी व्यायामशाळा आहे.
राजकीय स्थिती :
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून कन्नमवार नगर ओळखले जात होते. अनेक वर्षे अलका देसाई या ठिकाणी काँग्रेसच्या नगरसेवक होत्या. काँग्रेस कालांतराने मागे पडत गेली आणि शिवसेनेने येथे वर्चस्व मिळवले. सेनेचे माजी नगरसेवक दत्त्ता दळवी यांना महापौरपद प्राप्त झाले होते. मनसेच्या स्थापनेनंतर मराठी वसाहत असल्याने मनसेचे मंगेश सांगळे येथे नगरसेवक होते. यानंतर मनसेच्याच प्रियंका शृंगारे नगरसेवक राहिल्या. मागील पालिका निवडणुकीत शिवसेनेचे उपेंद्र सावंत नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. सेनेने पुन्हा एकदा बालेकिल्ला स्वतःकडे खेचून आणला आहे. आंबेडकरीं चळवळीचाही येथे जोर आहे. परंतु, ही ताकद येथे विविध राजकीय पक्षांत विभागली गेली आहे. पूर्वी भाजप येथे नावाला होती. मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे भाजपात गेल्याने या पक्षाला जोर प्राप्त झाला आहे. रा. स्व. संघाची शाखाही या विभागात लागते. कन्नमवार नगरपासून अगदी जवळ मंगतराम पेट्रोल पंपाजवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय आहे. कामगार वसाहत असूनही या पक्षाचे शून्य अस्तित्व या विभागात आहे.
पुनर्विकास केव्हा होणार?
मागील पंधरा वर्षांपासून म्हाडा वसाहत असलेल्या कन्नमवार नगरात पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत. एकूण 300 च्या वर इमारती आणि हातावर मोजता येतील इतक्याच इमारतींचा पुनर्विकास झाला आहे. अर्थात 300 तील काही मोजक्या इमारती या संक्रमण शिबिरात येतात. या इमारतींचा मात्र म्हाडामार्फत पुनर्विकास सुरू आहे. इतर इमारती पुनर्विकासाच्या आशेवर बसल्या आहेत. कुटुंब मोठी आणि खोल्या लहान होत चालल्या आहेत. पूर्व उपनगरात सहकार नगर(शेल कॉलनी), टिळक नगर, पंतनगर येथील म्हाडा इमारतींचा पुनर्विकास ज्या वेगाने होत आहे. त्या तुलनेत कन्नमवार नगर अतिशय संथ आहे. येथील अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. घरातील छत कोसळण्याच्या घटना आहेत. आज ना उद्या अनेक इमारती धोकादायक म्हणून घोषीतही होतील. त्या आधीच नियोजन म्हणून पुनर्विकास होणे महत्त्वाचे आहे. आता म्हाडानेच त्या साठी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.
– प्रशांत गायकवाड