मुंबई : धुराचे प्रचंड लोट, आगीच्या ज्वाळा, जीव वाचविण्यासाठी किंकाळ्या, धावपळ, अग्निशमन दलाचे आणि रुग्णवाहिकांचे सायरन, कोणताही दोष नसताना निपचित पडलेले १४ मृतदेह असे भयाण दृश्य मुंबापुरीने आज अनुभवले.
साकिनाका येथे आग लागून १२ कामगारांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच पुन्हा लोअर परळ येथे दुसरी घटना घडली. येथील कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस या तीन मजली इमारतीत असणाऱ्या एका पबला गुरुवारी मध्यरात्री १२ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास भीषण आग लागली. त्यात १४ जणांचा मृत्यू तर ५५ जण गंभीर जखमी झाले. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश आले.
याप्रकरणी पाच अधिकाऱ्यांवर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पालिकेने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तसेच पब मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत मानकर, हितेश संघवी आणि जिगर संघवी अशी पब मालकांची नावे आहेत.
ट्रेड हाऊस या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर मोजोस व वन अबव हे दोन पब आहेत. पब गच्चीवर असल्याने तेथे प्लॅस्टिक व बांबुचे बांधकाम होते. हुक्का पार्लरही चालवला जात होता. गुरुवारी मध्यरात्री अचानक मोझोस पबला आग लागली. आगीमुळे छत पेटला. याचवेळी वारा, लाकडी साहित्य, एसी व विद्यूत यंत्रणेमुळे आग वन अबव मध्ये पसरली. यावेळी अनेक जण कोंडले गेले. धुराचे लोट व आगीच्या ज्वाळांमुळे त्यांना पब बाहेर पडण्यास अडथळा आला. गच्चीवरील छत जळून खाली कोसळला. तर धुरांचे लोट तळमजल्यांपर्यंत पोहचले. तोपर्यंत १४ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये ११ महिलांचा तर ३ पुरुषांचा समावेश आहे. या दुर्घटनेत ५५ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ३० पुरुष आणि २५ महिलांचा समावेश आहे. भाटिया रुग्णालयात १३ तर एका जखमीवर ऐरोली बर्न रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ४१ जणांवर उपचार करून सोडून देण्यात आले, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. मृतांमध्ये पबमध्ये आलेल्या तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात आहे.
घटनास्थळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृह नेते यशवंत जाधव, पालिका आयुक्त अजोय मेहता, महापालिका जी-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्यासह आमदार सुनील शिंदे, नगरसेवक आशिष चेंबूरकर, समाधान सरवणकर, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, आशिष शेलार आदींनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
वाढदिवशीच काळाचा घाला
वन अबवमध्ये खुशबू मेहता (28)हिच्या वाढदिवसाची पार्टी होती. या पार्टीला कविता तेजल व त्यांची सात चुलत भावंडे सहभागी झाले होते. खुशबूसह तेजल गांधी व कवीता या दोन जणींचा गुदमरुन मृत्यू झाला. विरवा ललानी या २३ वर्षीय जीगरबाज तरुणाचाही अंत झाला. ललानी याने तब्बल २५ ते ३० जणांना वाचवल्याचे प्रत्यक्षर्दशींचे सांगितले.
मृतांची नावे –
प्रीती रोजनी (४९) तेजल गांधी (३६) प्राची खेतानी (३१) प्रमिला केणी (२८) किंजल शाह (२८) , कविता गोऱ्हानी (३६) पारुल (४५) मनिषा शाह (३०) याशा ठक्कर (२८) शेफाली दोषी (४५) , खुशबु (२८) सरबजीत परेरा (२४), विरवा ललानी (२३) धैर्या लखानी( २६).