मुंबई : राज्यातील पेट्रोलियम वितरकांकडून ग्राहकांना कमी तेलाची विक्री करुन ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे तपासणीमध्ये आढळून आल्याने ७ पेट्रोलपंप जप्त करुन ६ वितरकांविरुद्ध खटले नोंदविण्यात आले आहेत. राज्यातील सर्व पेट्रोलियम वितरकांची तपासणी करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस महासंचालक तथा नियंत्रक वैधमापन शास्त्र अमिताभ गुप्ता यांनी यंत्रणेतील संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार १६३६ पेट्रोल/डिझेल वितरकांच्या तपासणीत ११४१८ पंपाची तपासणी करण्यात आली. ५२ पंपाद्वारे कमी- जास्त वितरण होत असल्याचे आढळल्याने अनुसूची १० नुसार नोटीस देऊन बंद करण्यात आले आहे व हे पंप पुनर्पडताळणी व मुद्रांकन केल्यानंतर वापरास खुले करण्यात येणार आहे. या तपासणीत उल्लंघनाबाबत १७ खटले नोंदविण्यात आले आहेत.
कोकण विभागामध्ये १६० वितरकांची तपासणी करुन १०२० पंप तपासण्यात आले. यामध्ये एक पंप कमी वितरणामुळे बंद करुन एकाविरुद्ध खटला नोंदविण्यात आला आहे. ३० पंपातील त्रुटींमुळे त्यांना नोटीस देऊन बंद करण्यात आले आहे. पेट्रोलचे कमी वितरण करुन ग्राहकांची फसवणूक करणा-या मे.जाई ऑटोमोबाइल्स, देहाले, पो.पडघा, ता.भिवंडी या वितरकावर कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई महानगर विभागाच्या १४५ वितरकांची तपासणी करुन १७३४ पंप तपासण्यात आले. यामध्ये २ पंप कमी वितरणामुळे बंद करुन एका वितरणाविरुद्ध खटला नोंदविण्यात आला आहे. पेट्रोलियम पदार्थांचे कमी वितरण करुन ग्राहकांची फसवणूक करण्यामध्ये मे.चारकोप पेट्रोलियम, महावीर नगर, कांदिवली (प) या वितरकाचा समावेश आहे. एकूण ४१ पंपातील त्रुटींमुळे त्यांना नोटीस देऊन बंद करण्यात आले आहे.
पुणे विभागात ३७७ वितरकांची तपासणी करुन २५११ पंप तपासण्यात आले. २ पंप कमी वितरणामुळे बंद करुन २ वितरकांविरुद्ध खटला नोंदविण्यात आला. १७ पंपातील दोष आढळून आल्यामुळे त्यांना नोटीस देऊन बंद करण्यात आले आहे. पेट्रोलचे कमी वितरण करणा-या ग्राहकांची फसवणूक करण्या-या मे.सिद्धीविनायक पेट्रोलियमवर (सांडगेवाडी, कराड तासगाव रोड,ता.पुळुस, जि.सांगली) कारवाई करण्यात आली.
नाशिक विभागामध्ये ३२२ वितरकांची तपासणी करुन २००० पंप तपासण्यात आले. यामध्ये २ पंप कमी वितरणामुळे बंद करुन २ वितरकांविरुद्ध खटला नोंदविण्यात आला. ९९ पंपातील दोषामुळे नोटीस देऊन बंद करण्यात आले.औरंगाबाद विभागामध्ये २९० वितरकांची तपासणी करुन 1661 पंप तपासण्यात आले. यामध्ये २७ पंपातील दोषामुळे नोटीस देऊन बंद करण्यात आले. अमरावती विभागात १८० वितरणाची तपासणी करण्यात आली असून ११८१ पंप तपासण्यात आले. यामध्ये २१ पंपातील त्रुटीमुळे नोटीस देऊन बंद करण्यात आले. नागपूर विभागामध्ये १६२ वितरकांची तपासणी करुन ११२९ पंप तपासण्यात आले. यामध्ये १७ पंपातील त्रुटींमुळे नोटीस देऊन बंद करण्यात आले. वितरणाबाबत शंका आल्यास प्रमाणित मापाद्वारे तपासणी करावी
ग्राहकांनी वितरणाबाबत शंका असल्यास अचूक वितरणाची खात्री करण्यासाठी पंपावर उपलब्ध असलेल्या ५ लीटर प्रमाणित मापाद्वारे तपासणी करावी. विधीग्राह्य त्रुटींपेक्षा म्हणजे २५ मिलीपेक्षा जास्त कमी वितरण होत असल्याचे निदर्शनास आल्यास याबाबत ग्राहकांनी क्षेत्रिय वैधमापन शास्त्र विभागाशी संपर्क साधावा किंवा यंत्रणेच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र.०२२- २२८८६६६६असून ई-मेल dclmms_complaints@yahoo.com या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन अप्पर पोलीस महासंचालक तथा नियंत्रक वैद्यमापन शास्त्र अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.