मुंबई, दि. ३० : कामगार आयुक्त कार्यालय, मुंबई यांचे वतीने प्रथम स्वयंसेवी संस्था व चाईल्ड लाईन यांचे सहकार्याने लॉकडाऊन काळात लोकमान्य टिळक टर्मिनसहून मुळगावी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना अल्पोपहार वाटप करण्यात आल्याची माहिती कामगार उपायुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
राज्याचे कामगार आयुक्त, डॉ. महेंद्र कल्याणकर, श्रीमती शिरीन लोखंडे, अप्पर कामगार आयुक्त, कोकण विभाग, श्री. संतोष भोसले, कामगार उपायुक्त, मुंबई उपनगर यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी हा उपक्रम राबविला. यामध्ये परप्रांतीय कामगार / मजुरांना खाद्यपदार्थांचे पाकीट व पाण्याच्या बॉटल्सचे वितरण करण्यात आले.
संपूर्ण लॉकडाऊन काळात मुंबई उपनगर क्षेत्रातील बांद्रा टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यादरम्यान कोरोना प्रतिबंधक नियम पाळून उपस्थित कामगारांकडून त्यांना येत असलेल्या समस्यांबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- विविध बांधकाम प्रकल्पावरील कामगारांसाठी भोजनाची बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी उपलब्ध करुन दिली आहे,त्याचा लाभ १७,२७८ कामगारांना होत आहे.
- उपनगर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील नोंदित बांधकाम कामगार,घरेलू कामगार यांना १५००/- प्रत्येकी आर्थिक सहाय्य त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे.
कामगार आयुक्त कार्यालयाने स्थलांतरीत कामगारांना सहाय्य करण्यासाठी सहायता केंद्र स्थापन केले असून आठवडयातील सातही दिवस हे केंद्र कार्यान्वित आहेत. तसेच स्थलांतरीत कामगारांना सहाय्य करण्याकरीता नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून संबंधित नोडल अधिकारी दूरध्वनी / मोबाईल क्रमांक तसेच ई-मेल याबाबतची माहिती सोशल मिडीयाद्वारे प्रसिध्द करण्यात आली आहे, असे कामगार आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.