डोंबिवली, (प्रशांत जोशी) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कारभाराविषयी विविध अनोख्या गोष्टींमुळे सतत नवीन-नवीन प्रकरणे सध्या चर्चेचा विषय होत आहे. पालिकेच्या प्रभाग समितींच्या सभेला लोकप्रतिनिधीच्या गैरहजेरीमुळे सभा तहकुबी होते. मात्र ‘ई’ प्रभाग समितीच्या नियोजित सभेला चक्क सर्वच अधिकाऱ्यांनीच दांडी मारल्याने संतापलेल्या नगसेवकांनी दोन तास ठिय्या आंदोलन करीत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नांवे लाखोली वाहिली. अधिकाऱ्यांच्या तऱ्हेवाईक वर्तणुकीमुळे प्रभागातील विकास कामे ठप्प झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. अखेर उपायुक्त धनाजी तोरस्कर यांच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे घेतले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका 10 [ई] प्रभाग क्षेत्राची सभा रिजेन्सी येथील महापालिका कार्यालयात शुक्रवारी आयोजित केले होती. प्रभाग समितीमध्ये बारा सदस्य असून सभेची गणपूर्ती झाली होती. नियोजित वेळेपर्यंत प्रभागक्षेत्र अधिकारी तसेच अन्य महत्वाच्या विषयी अधिकारी उपस्थित नसल्याने सदस्यांमध्ये गोंधळ झाला. मुख्य म्हणजे सभेपुढे येणारे विषय अतिशय महत्वाचेच होते. यामध्ये प्रभागातील नगरसेवक निधी माध्यमांतून नवीन रस्ते-पायवाटा, रस्त्यातील खड्डे, दिवाबत्ती, आरोग्य आणि पाण्याची समस्या यांचा समावेश होता. ग्रामीण विभागातील हे प्रभाग असल्यामुळे कोणतीच विकास कामे होत नाहीत. परिणामी येथील करदाते नागरिक नगरसेवकांच्या जनसंपर्क कार्यालावर मोर्चा आणून सतत जाब विचारात असतात. या सर्व विषयांची उत्तरे या सभेतून पालिका अधिकाऱ्यांकडून नगरसेवकांना अपेक्षित होते. परंतु अधिकारी गैरहजर राहिल्याने नगरसेवकांचा पारा चढला आणि त्यांनी ठिय्या आंदोलन केले. या ठिय्या आंदोलनात नगरसेवक प्रभाकर जाधव, प्रेमा म्हात्रे, डॉ. सुनिता पाटील, पूजा म्हात्रे, विनोद काळण, प्रमिला पाटील, रुपाली म्हात्रे यांनी ठिय्या आंदोलन केले.
एम.आय.डी.सी. कार्यालयावर हंडा मोर्चा :
पाणीपुरवठा करणारे बारवी धारण पावसाळी मोसमात दोन वेळा ओवरफ्लो होऊनही ‘ई’ प्रभाग क्षेत्रातील नागरिकांना पाण्यासाठी आजही वणवण भटकावे लागत आहे. नगरसेविका डॉ. सुनिता पाटील आणि नगरसेवक विनोद काळण यांच्या नेतृत्वाखाली एम.आय.डी.सी. कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांनी नेहमीच्या सरकारी शैलीतून मोर्चाच्या प्रतिनिधी मंडळातील सदस्यांना थोड्याच दिवसात काम करतो, होईल समस्या सुटतील अशी आश्वासन दिले. मात्र दिलेल्या आश्वासनाची पूर्ती झाली नाही तर मात्र आम्ही उग्र आंदोलन करू असे डॉ. सुनिता पाटील यांनी सांगितले. यावेळी पदाधिकारी मनीषा राणे यांच्यासह समस्याग्रस्त नागरिक मोढ्या संख्येने हंडा मोर्च्यात सहभागी झाले होते.