मुंबई: महाराष्ट्राच्या नाटयसंस्कृतीला मोठा इतिहास असून हा ऐतिहासिक वारसा जतन करुन तो पुढच्या पिढीला देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
मुलुंड येथील मुंबई महापालिकेने नूतनीकरण केलेल्या ‘ महाकवी कालीदास नाटयमंदिर’ चे लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी झाले..
या समारंभास आमदार अशोक पाटील, आमदार सुनिल राऊत, उप महापौर हेमांगी वरळीकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, सभागृह नेता यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे, बाजार व उद्यान समिती अध्यक्ष सान्वी तांडेल, महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सिंधू मसुरकर, माजी महापौर तथा नगरसेविका स्नेहल आंबेकर, माजी महापौर दत्ता दळवी, राजे शिवाजी क्रीडा संकुलाचे विश्वस्त आदेश बांदेकर, ज्येष्ठ नाटय कलावंत गंगाराम गवाणकर, अशोक हांडे, सुप्रसिध्द मराठी सिनेअभिनेते सुबोध भावे व प्रसाद कांबळी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्री. विजय सिंघल, उप आयुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) डॉ. किशोर क्षीरसागर हे मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलताना पुढे म्हणाले की, बृहन्मुंबईत अनेक ठिकाणी लोकार्पण समारंभ होत असताना काही कामे ही कायम स्मरणात राहत असतात त्यापैकी हे एक चांगले काम असल्याचे ते म्हणाले.या कामासाठी मेहनत घेणाऱया महापालिकेच्या सर्व अधिकाऱयांचे अभिनंदन करीत असल्याचे ते म्हणाले. अतिशय बारीक गोष्टीवर लक्ष देऊन या नाटयमंदिराचे नूतनीकरण करण्यात आले असून या नाटयमंदिरातील आसनेसुध्दा चांगल्या दर्जाची असल्याचे आवर्जून त्यांनी सांगितले. या नाटयसंकुलाच्या परिसरात मोकळी जागा असून स्थानिक कलावंताना वाव मिळावा म्हणून याठिकाणी आर्टगॅलरीची निर्मिती करावी अशी सूचना त्यांनी महापालिका प्रशासनास केली. नाटकामध्ये कलावंत हे खुप मेहनत घेत असून नाटक, चित्रपट ही सर्वसामान्यांची भूक असून नाटयवेड हे मुंबईकरांच्या रक्तात असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. अंधेरीच्या शहाजी राजे क्रीडा संकुलात नव्याने तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमच्या कामाचे त्यांनी शेवटी कौतुक करुन यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
मुंबईचे महापौर महाडेश्वर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, नाटयकलावंत गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कालीदास नाटयमंदिराच्या नूतनीकरण कामाचा श्रीगणेशा करण्यात येऊन अवघ्या पंधरा महिन्यात महापालिकेने नूतनीकरणाचे काम चांगल्यारितीने पूर्ण केले असल्याचे त्यांनी सांगितले.
नाटयकलावंत अशोक हांडे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, कालीदास नाटयमंदिराच्या नूतनीकरणाचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हे अतिशय चांगल्या दर्जाचे केले असून आम्ही कलावंत मंडळीनी ज्या काही सूचना महापालिकेला केल्या आहे त्या लवकरच पूर्ण होतील अशी आम्हाला हमी असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही कलाकार मंडळीनी हे नाटयगृह बघितल्यानंतर एक कलावंत म्हणून स्वप्नपूर्ती झाली असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांनी आपल्या प्रास्ताविकातून या नाटयमंदिराच्या निर्मितीची पार्श्वभूमी सांगितली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.त्यानंतर फित कापून नाटयगृहाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.