मुंबई : स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कलाकेंद्र ही शैक्षणिक, सामाजिक, सां स्कृतिक कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या ‘कलाश्रम’ अंतर्गत ‘अभियान सन्मान’ हा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राबविण्यात येतो. २७ जून ला या उपक्रमाचे सोळावे पुष्प आहे. स्वत:बरोबर समाजासाठी वैविध्यपूर्ण कामकरणार्या व्यक्तींची या उपक्रमात दखल घेतली जाते. त्यांच्या कर्तृत्त्वाचे आलेख मांडणारे ‘दखलपत्र’ त्यांना देण्यात येते.
यंदा दिवंगत आत्माराम जगताप, चंद्रकांत पुरी, तारामती मोरे आणि शरद जोशी यांच्या जून २०१९ महिन्यातील स्मृतीदिनाचे निमित्त घेऊन हे ‘दखलपत्र’ जनजागृतीचे कार्यक्रम करणारे अशोक हसोळकर, लोककलेच्या संवर्धनात सक्रिय असलेल्या उल्का दळवी-गायकवाड, अभिनेता प्रणव रावराणे आणि पुस्तक समिक्षक अरविंद दोडे यांना सर्वोत्तम काम केल्याच्या निमित्ताने अभिनेते विजय कदम यांच्या हस्ते सन्मानपूर्वक हे दखलपत्र दिले जाणार आहे. हा कार्यक्रम गुरूवार, २७ जून, सायंकाळी ७ वाजता पु.ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, २ रा मजला, हिंदुस्थानी हॉल, प्रभादेवी येथे होणार आहे. महापौर पुरस्कार विजेत्या शशिकला खंदारे या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणार आहे. दखलपत्र वाचनात अक्षय जाधव, श्वेता सलाम, योगेश शेडगे, पुजा खंदारे या कलाकारांचा सहभाग आहे. जून महिन्याचे मानकरी म्हणून वग सम्राट दादु इंदुरीकर यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. सुवर्णा गुराम यांच्या निवेदनात शिवाजी रेडेकर ‘गाढवाचं लग्न’ या अजरामर कलाकृतीचा नाट्यप्रवेश सादर करून अभिवादन करणार आहे. आजवर पद्मश्री वामन केंद्रे, पद्मश्री क्रांती शहा, शिवाजी साटम, अलका कुबल-आठल्ये, जयश्री खाडीलकर-पांडे, नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, दिनकर गांगल, अशोक हांडे, गंगाराम गवाणकर, विसुभाऊ बापट, अरूण म्हात्रे, अनंत पणशीकर, रविंद्र आवटी, मधु खामकर, प्रदीप म्हापसेकर यांचे प्रमुख पाहुणे म्हणून अनमोल मार्गदर्शन लाभले आहे. कार्यक्रम विनामूल्य असल्याचे कला केंद्रच्या संचालिका नंदिनी नंदकुमार पाटील यांनी कळवले आहे.