सिंधुदुर्ग : काजू प्रक्रिया उद्योगाला जीएसटी कर प्रणालीद्वारे ५ टक्के कर करणे ही बाब अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार, अधिकारी वर्ग यांच्या सहकार्याने घडू शकली. काजू उद्योगामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत असतात. या अनुषंगाने जीएसटी कर प्रणाली राज्याचा अडीच टक्के वाटा आहे.पूर्वीप्रमाणेच ही कर परतावा योजना सुरु रहावी यासाठी मी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे बोलताना दिली.
सिंधुदुर्ग तसेच कोकणातील काजू उत्पादक शेतकरी, व्यापरी संघ, काजू प्रक्रिया उद्योगसंघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, व्यापारी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब वळंजू, काजू प्रक्रिया उद्योग संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, काका कुडाळकर, शेतकरी प्रतिनीधी संजय नाईक, सुरेश नेरकर, सावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, नियोजन अधिकारी हरीबा थोरात उपस्थित होते.
सिंधुदुर्गात काजू उद्योग आठ महिनेच सुरु असतो. तथापि तो बारा महिने सुरु राहण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काजू लागवडीवर भर देण्याबरोबरच काजू पिक अधिक किफायतशीर होण्यासाठी काजूमध्ये आंतरपिक लागवडीवर भर देण्याची गरज असल्याचे सांगून पालकमंत्री केसरकर म्हणाले की, यासाठी कृषि विभागामार्फत आंतरपिक लागवडीच्या प्रोत्साहनपर योजनाही सुरु केल्या आहेत. काजूच्या बोंडापासुन विविध प्रकारची पेय तयार करण्याच्या संशोधनासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री केसरकर यांनी काजू वरील जीएसटी कमी करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केल्याबद्दल यावेळी अभिनंदन केले. यावेळी संजय नाईक, काका कुडाळकर, बाळासाहेब वळंजू यांचीही अभिनंदनपर भाषणे झाली.
सिंधुदुर्गात काजू उद्योगाला १०० वर्षे पूर्ण
काजू संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन सिंधुदुर्गातील काजू उद्योगास १०० वर्षे पूर्ण झाल्याची माहिती दिली. १९१७ साली वेंगुर्ल्याला काजू उद्योग सुरु झाला १९२७ साली व्यवसाय सर्टिफिकेट मिळाले. अशा या जुन्या तसेच रोजगार निर्मितीत महत्वाचे स्थान बजावण्याऱ्या काजू उद्योगास ५ टक्के जीएसटी केल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री महोदयांचे जाहीर आभार यावेळी मानले.
समारंभाचे सूत्रसंचालन शशांक मराठे यांनी केले. समारंभास भास्कर कामत, राजन पोकळे, नितीन वाळके तसेच कोकणातील काजू संघटनांचे प्रतिनीधी, व्यापारी प्रतिनीधी तसेच काजू उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सुधीर झांटे यांनी आभार मानले.